सात्विक-चिरागची फायनलमध्ये धडक; तिसऱ्यांदा थायलंड ओपनच्या विजेतेपदासाठी सज्ज (Photo-X)
क्रीडा

सात्विक-चिरागची फायनलमध्ये धडक; तिसऱ्यांदा थायलंड ओपनच्या विजेतेपदासाठी सज्ज

भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दुहेरीतील अव्वल जोडीने थायलंड ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Swapnil S

बँकॉक : भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दुहेरीतील अव्वल जोडीने थायलंड ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. शनिवारी झालेल्या अटीतटीच्या आणि थरारक उपांत्य सामन्यात भारतीय जोडीने मलेशियाच्या गोह झे फेई आणि नूर इझुद्दीन या जोडीचा १९-२१, २२-२०, २१-१६ असा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सात्विक आणि चिरागने ८२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात दबावाखाली उत्कृष्ट खेळ करत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या मलेशियन जोडीवर मात केली. "या वर्षाची सुरुवात चांगली झाली नव्हती आणि मानसिकदृष्ट्याही आम्ही चांगल्या स्थितीत नव्हतो, परंतु थॉमस कपमधील कांस्यपदकाने आमचा आत्मविश्वास वाढवला आणि आम्ही या वर्षातील पहिल्या अंतिम फेरीत पोहोचलो," असे चिराग शेट्टी याने सांगितले.

पाच लाख अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत सात्त्विक चिराग जोडीने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली असून त्यांनी यापूर्वी २०१९ आणि २०२४ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात सात्विक आणि चिराग या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या लिओ रॉली कनँडो आणि डॅनियल मारथिन यांच्याशी होईल.

मलेशियन जोडीने सामन्याच्या सुरुवातीला ३-१ अशी आघाडी घेतली होती. पहिल्या गेमच्या विश्रांतीपर्यंत मलेशियन जोडी ११-८ अशी आघाडीवर होती. चिरागच्या काही चुकांमुळे ही पिछाडी ९-१५ अशी वाढली. मलेशियाच्या जोडीने पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सात्विक आणि चिरागने स्मॅशेसचा वेग बदलत ११-९ अशी आघाडी घेतली. मलेशियाने १३-१३ अशी बरोबरी साधली, परंतु चिरागच्या दमदार स्मॅशने भारताला १६-१४ अशी आघाडी मिळवून दिली. स्कोअर २०-२० असा बरोबरीवर असताना अत्यंत तीव्रतेच्या रॅलीमध्ये भारताने बाजी मारली.

निर्णायक गेममध्ये सात्विकने आक्रमक खेळ करत लागोपाठ स्मॅशेस मारले. मलेशियन जोडीच्या चुकांमुळे सात्विक-चिरागने १९-१४ अशी आघाडी वाढवली. अखेर भारतीय जोडीने पुढील दोन गुण मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...