चंदीगड : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पंजाब किंग्जने साईराज बहुतुलेची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
५२ वर्षीय बहुतुलेने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत भारतासाठी २ कसोटी आणि ८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. २०२३ पासून सुनील जोशी पंजाब किंग्जच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी होते. मात्र आता त्यांची जागा बहुतुलेने घेतली आहे.
या आधी बहुतुले याने केरळ, गुजरात, विदर्भ, बंगाल या देशांतर्गत संघांसह आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रक्षिक्षकपद भूषवले आहे.
बहुतुलेचे स्वागत करताना पंजाब किंग्जचे सीईओ सतीश मेनन म्हणाले की, सुनील जोशी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभारी आहोत. बहुतुले यांना आमच्या प्रशिक्षक पथकात सामील करून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. बहुतेले यांचे गोलंदाजीतील ज्ञान, देशांतर्गत गोलंदाजांना मार्गदर्शनाचा व्यापक अनुभव आणि रणनीतीची कौशल्य आमच्या संघासाठी उपयुक्त ठरतील.
मी पंजाब किंग्जसाठी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील होत असल्याने मला आनंद होत आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी खूप उत्साही आहे. हा संघ क्षमतावान आहे. संघात प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असल्याचे बहुतुले म्हणाला.