न्यूयॉर्क : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चीनच्या झेंग चिनवेन हिने चमकदार पुनरागमन करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली आहे. त्याशिवाय जपानची नाओमी ओसाका, अमेरिकेची कोको गॉफ यांनीही आगेकूच केली.
अमेरिकन ओपन या वर्षातील चौथ्या व अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीला गेल्या आठवड्यात प्रारंभ झाला. यंदा या स्पर्धेचे १४६वे वर्ष सुरू आहे. २०२५मध्ये स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि बेलारूसची आर्यना सबालेंका यांनी अमेरिकन ओपनचे जेतेपद मिळवले होते. यंदा पुरुषांमध्ये इटलीच्या यॅनिक सिनरच्या अनुपस्थितीत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हला, तर महिलांमध्ये सबालेंकाला अग्रमानांकन प्राप्त झाले आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री झालेल्या महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत १२१व्या मानांकित झेंग हिने अंतिम सात गेम जिंकत २२ व्या मानांकित मॅडिसन कीज हिचा १-६, ७-६ (७-३), ७-५ असा पराभव केला. पहिला गेम ६-१ असा सहज जिंकल्यानंतर आणि तिसऱ्या सेटमध्ये ५-० अशी भक्कम आघाडी घेतल्यानंतरही अमेरिकेच्या मॅडिसन कीजला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कोपरच्या शस्त्रक्रियेनंतर पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आलेल्या २४ वर्षीय झेंगने ५-१ अशा स्थितीत मॅच पॉइंट वाचवत सलग सात गेम जिंकले आणि विजय मिळवला. पुढील फेरीत झेंगचा सामना २०२२ ची विजेती स्विआटेकशी होणार आहे.
दरम्यान, पुरुष एकेरीत अमेरिकेच्या ९व्या मानांकित टेलर फ्रिट्झला २४व्या मानांकित फ्रान्सिस्को सेरुंडोलोने ३-६, ४-६, ६-३, ६-४, ६-४ असे पराभूत केले. पहिल्या दोन सेटमध्ये आघाडी घेतल्यानंतर फ्रिट्झचा पराभव झाला. ५व्या मानांकित फ्लेव्हियो कोबोलीला अलेक्झांडर ब्लॉकने पराभूत केले. अव्वल मानांकित ॲलेक्झांडर झ्वेरेव्हने अलेजांड्रो ताबिलोचा ६-२, ७-६ (२), ६-२ असा पराभव केला.
महिलांमध्ये जपानच्या १३व्या मानांकित ओसाका हिने एलिस मर्टेन्स हिचा ६-३, ३-६, ७-५ असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. १०व्या मानांकित अमांडा ॲनिसिमोव्हा हिला ॲनास्टासिया पोटापोव्हाने ६-२, ७-५ असे नमवले. २०२३ ची चॅम्पियन कोको गॉफने क्रिस्टिना बुक्साचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.