बंगळुरू : अपेक्षेप्रमाणे गतविजेत्या कर्नाटकसमोर मुंबईचे पितळ उघडे पडले. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटकने मुंबईवर ५५ धावांनी वर्चस्व गाजवून थाटात उपांत्य फेरी गाठली. शानदार फॉर्मात असलेला देवदत्त पडिक्कल (९५ चेंडूंत नाबाद ८१ धावा) कर्नाटकच्या विजयाचा शिल्पकार ठरला, तर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीसह सुमार क्षेत्ररक्षणाचा मुंबईला या लढतीत फटका बसला.
बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या या लढतीत मुंबईने दिलेले २५५ धावांचे लक्ष्य गाठताना कर्नाटकने ३३ षटकांत १ बाद १८७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी अंधूक सर्यप्रकाश व पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. अखेरीस अर्धा तास प्रतीक्षा करूनही खेळ सुरू होणे शक्य नसल्याने व्हीजेडी पद्धतीद्वारे कर्नाटकला विजयी घोषित करण्यात आले. कारण ३३ षटकांनंतर त्यांना १३३ धावांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते. कर्नाटकने त्या तुलनेत ५५ अधिक धावा केल्या. आता गुरुवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात कर्नाटकसमोर पंजाब किंवा मध्य प्रदेश यांचे आव्हान असेल.
२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांत विजय हजारे स्पर्धेच्या ३३व्या हंगामाला प्रारंभ झाला. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली होती. २०२४-२५च्या हंगामात कर्नाटकने अंतिम फेरीत विदर्भाला नमवून पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती.
बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे.
दरम्यान, मुंबईने क-गटातून दुसरे स्थान मिळवताना उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तसेच उपांत्यपूर्व सामन्याकडे सर्फराझ खान विरुद्ध पडिक्कल असेही पाहिले जात होते. मात्र लढतीच्या दिवशी सकाळी सर्फराझला दुखापत झाल्याचे समजल्याने तो या लढतीस मुकला. तसेच तुषार देशपांडेही उपलब्ध नव्हता. अशा स्थितीत सिद्धेश लाडच्या नेतृत्वात खेळणारा मुंबईचा संघ आधीच पिछाडीवर पडला. साखळी फेरीत रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल मुंबईकडून खेळले. मात्र आता ते भारतीय संघाचा भाग असल्याने उपांत्यपूर्व फेरीस अनुपलब्ध होते.
कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. अंक्रिश रघुवंशी (२७) व इशान मुलचंदानी (२०) यांनी १२ षटकांत फक्त ३६ धावांची संथ सुरुवात केली. वेगवान गोलंदाज विद्याधर पाटीलने इशान व मुशीर खान (९) यांना बाद केले. विजयकुमार वैशाखने अंक्रिशचा त्रिफळा उडवला. हार्दिक तामोरे (१) देखील अपयशी ठरला. ४ बाद ६० अशा स्थितीतून सिद्धेश व डावखुरा शम्स मुलाणी यांनी संघाला सावरले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७६ धावांची भर घातली. सिद्धेश ३८ धावांवर बाद झाल्यावर सूर्यांश शेडगे (१६) व साईराज पाटील (नाबाद ३३) यांच्या साथीने शम्सने संघाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. शम्सने ८ चौकारांसह ९१ चेंडूंत ८६ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने ५० षटकांत ८ बाद २५४ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा पडिक्कल व कर्णधार मयांक अगरवाल यांनी १० षटकांत ४४ धावांची सलामी नोंदवली. मोहित अवस्थीने मयांकला (१२) बाद केले. मात्र त्यानंतर पडिक्कल व करुण नायर यांची जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी रचली. पडिक्कलने ११ चौकारांसह नाबाद ८१, तर नायरने ११ चौकारांसह नाबाद ७४ धावा फटकावल्या. तसेच पडिक्कलचे मुंबईने दोन झेल सोडले. आता रणजी स्पर्धेत मुंबईचा संघ चांगली कामगिरी करेल, असे अपेक्षित आहे.
सौराष्ट्रचा उत्तर प्रदेशला धक्का
बंगळुरू येथेच झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात सौराष्ट्रने उत्तर प्रदेशवर १७ धावांनी सरशी साधली. सौराष्ट्रने ड-गटातून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली होती. तर उत्तर प्रदेश हा ब-गटात सर्व ७ सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला होता. प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने ५० षटकांत ८ बाद ३१० धावांचा डोंगर उभारला. अभिषेक गोस्वामी (८८) व समीर रिझवी (नाबाद ८८) यांनी शानदार अर्धशतके साकारली. मात्र सौराष्ट्रने प्रत्युत्तरात ४०.१ षटकांत ३ बाद २३८ धावांपर्यंत मजल मारली. हार्विक देसाईे ११६ चेंडूंत नाबाद १०० धावा केल्या, तसेच प्रेरक मंकडने ६७ धावा केल्या. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा व्हीजेडी पद्धतीद्वारे सौराष्ट्र १७ धावांनी पुढे होता. त्यामुळे त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत त्यांच्यापुढे दिल्ली किंवा विदर्भाचे आव्हान असेल.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ५० षटकांत ८ बाद २५४ (शम्स मुलानी ८६, सिद्धेश लाड ३८; विद्याधर पाटील ३/४२) पराभूत
कर्नाटक : ३३ षटकांत १ बाद १८७ (देवदत्त पडिक्कल नाबाद ८१, करुण नायर नाबाद ७४; मोहित अवस्थी १/२४)