भिवंडी : तीन जणांनी आपसात संगनमत करून पेट्रोल पंप उघडण्याच्या नावाने व्यावसायिकाला ४१ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरुण जैस्वाल, मनोज शर्मा, अमित अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी राजकुमार महेंद्र ठाकूर हे भिवंडीतील मानसरोवर येथील सोहम शिवम इमारतीत राहत आहेत. तर त्यांना पेट्रोल पंप व्यवसायात रुची असल्याने त्यांनी पेट्रोल पंप उघडण्याचे ठरवले होते. १३ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २४ च्या कालावधीत वरील तिघा आरोपींनी आपसात संगनमत करून वेगवेगळ्या फोनवरून संपर्क करून ते इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मधून बोलत असल्याचे सांगितले. पेट्रोल पंप उघडण्याकरिता रजिस्ट्रेशन फी, सिक्युरिटी फी, लायसन्स आणि मशिनरी आदींसाठी राजकुमारकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. तसेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ई-मेलद्वारेही पैश्यांसाठी मेल केला होता. त्यामुळे राजकुमारने आरोपींनी दिलेल्या अकाऊंटवर वडिलांच्या बँक खात्यातून एकूण ४१ लाख ४९ हजार रुपये आर.टी.जी.एस.च्या माध्यमातून पाठवले आहेत; मात्र त्यानंतर तिघांनीही ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याची फिर्याद नोंदवली आहे.