अंबरनाथ: अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले अंबरनाथ येथील नवीन न्यायालयाचे काम अखेर पूर्ण झाले असून, येत्या ९ ऑगस्ट रोजी या वास्तूचे उद्घाटन होणार आहे. यामुळे नागरिकांसह पोलीस आणि वकील वर्गाची उल्हासनगर न्यायालयापर्यंत होणारी पायपीट थांबणार आहे.
सध्या अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील सर्व खटले उल्हासनगर येथील न्यायालयात चालतात. १९८९ मध्ये उभारलेल्या या न्यायालयावर कामाचा प्रचंड ताण होता.
हा ताण कमी करण्यासाठी अंबरनाथ येथे स्वतंत्र न्यायालयाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीला यश येऊन सात वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये, १९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयाच्या भव्य तीन मजली इमारतीचे बांधकाम सुमारे तीन वर्षांपूर्वीच पूर्ण केले होते. मात्र, न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडल्याने उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला होता. न्यायालयाच्या जागेजवळून जाणाऱ्या पाण्याच्या मोठ्या जलवाहिन्या आणि विकास आराखड्यातील रस्त्याचे अपूर्ण काम हे मुख्य अडथळे होते. गेल्या वर्षभरात प्रशासनाने हे अडथळे दूर करून रस्त्याचे काम पूर्ण केले. तसेच, इमारतीचे रंगकाम आणि फर्निचरची कामेही पूर्णत्वास नेण्यात आली.
नुकतीच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समितीने इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले, ज्यामुळे उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला.
वेळेची आणि श्रमाची होणार बचत
नवीन न्यायालय सुरू झाल्याने अंबरनाथ, शिवाजीनगर (अंबरनाथ), बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व प्रकरणे येथेच चालवली जातील. यामुळे प्रत्येक खटल्यासाठी उल्हासनगरला जाण्याचा नागरिकांचा, पोलिसांचा आणि वकिलांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. या निर्णयामुळे न्यायदान प्रक्रियेलाही गती मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.