भिवंडी : नशेत असलेल्या तीन मित्रांनी क्षुल्लक वादातून आपसात संगनमत करून चौथ्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यास गंभीर जखमी केल्याची घटना नारपोली चौकात घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस पाटील, रितेश, बाला अशी गुन्हा दाखल झालेल्या मित्रांची नावे आहेत, तर जय राजू यादव (२२) हा या हल्ल्यात जखमी झाला आहे. दरम्यान, १४ मार्च रोजी धुळवडीत तेजस, रितेश आणि बाला यांनी कोणती तरी नशा केली होती. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास नारपोली चौकात जय यादव हा तिघांच्या समोरून जात असताना तो त्या ठिकाणी न थांबल्याच्या रागातून आरोपी तिघांनी नशेत राजूशी शाब्दिक बाचाबाची करून धक्काबुक्की करीत धारदार वस्तूने राजूवर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी या तिघांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोउनि सोनाली पाटील करीत आहेत.