उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेतील मॅन्युअल निविदांच्या कथित अनियमिततेवरून सुरू झालेल्या वादाला आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी थेट ‘ब्रेक’ लावला आहे. गेल्या चार वर्षांत मॅन्युअल पद्धतीने काढण्यात आलेल्या निविदांतील कथित त्रुटींच्या चौकशी अहवालाची छाननी सुरू असतानाच आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. चौकशी अहवालाचे अंतिम निष्कर्ष समोर येईपर्यंत विकासकामांसाठी एकही नवीन मॅन्युअल निविदा प्रस्तावित किंवा प्रसिद्ध करू नये, असे तातडीचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे नगरसेवक संजय सिंह यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या मॅन्युअल टेंडरच्या मुद्द्याला आता प्रशासकीय स्तरावर गंभीर वळण मिळाले आहे.
भाजप नगरसेवक संजय सिंह यांनी महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या चार वर्षांत मॅन्युअल पद्धतीने राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त कार्यालयाने १५ जुलैला पत्र जारी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शहर अभियंत्यांनी या संदर्भातील चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर केला असून सध्या त्याची छाननी सुरू आहे. या अहवालाचे अंतिम निष्कर्ष निश्चित होईपर्यंत कोणत्याही विकासकामासाठी नव्याने मॅन्युअल निविदा काढू नयेत, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी मुख्य लेखा अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक आणि शहर अभियंत्यांना दिले आहेत. आदेशाच्या अंमलबजावणीत विलंब अथवा हयगय होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही बजावण्यात आले आहे. यापूर्वी महासभेतही संजय सिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले होते. आता प्रत्यक्षात नवीन मॅन्युअल निविदांना स्थगिती मिळाल्याने चौकशी अहवालात नेमके काय निष्पन्न होते आणि दोष आढळल्यास प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मॅन्युअल निविदांमधील कथित अनियमिततेचा मुद्दा आम्ही पुराव्यांसह प्रशासनासमोर मांडला होता. आयुक्तांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत नव्या मॅन्युअल निविदांना स्थगिती दिल्याने आमच्या मागणीची गंभीर दखल घेतली आहे. आता चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि महापालिकेच्या प्रत्येक रुपयाचा हिशेब जनतेसमोर ठेवावा, ही आमची ठाम मागणी आहे.- संजय सिंह, नगरसेवक, भाजप
मॅन्युअल निविदांसंदर्भातील चौकशी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून त्याची सखोल छाननी सुरू आहे. अंतिम निष्कर्ष समोर येईपर्यंत विकासकामांच्या नव्या मॅन्युअल निविदा प्रस्तावित अथवा प्रसिद्ध न करण्याचे निर्देश दिले आहेत. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित केले जाईल. चौकशीअंती वस्तुस्थितीनुसार योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल.- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका