लोकल विलंबाने हाल; डोंबिवली स्थानकाजवळ डबा घसरला; अनेक लोकल रद्द, सेवा विस्कळीत; प्रवाशांची कसरत X
ठाणे

लोकल विलंबाने हाल; डोंबिवली स्थानकाजवळ डबा घसरला; अनेक लोकल रद्द, सेवा विस्कळीत; प्रवाशांची कसरत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाजवळ सकाळी ८.०९ च्या सुमारास लोकलचे एक चाक रुळावरून घसरले. या घटनेमुळे कोपर ते कल्याणदरम्यान वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. त्यानंतर लोकल सेवा तब्बल २.४५ तासांनी म्हणजे १०.४५ वाजेपासून सुरू झाली. या घटनेमुळे लोकलचे वेळापत्रक पार कोलमडले.

Swapnil S

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाजवळ सकाळी ८.०९ च्या सुमारास लोकलचे एक चाक रुळावरून घसरले. या घटनेमुळे कोपर ते कल्याणदरम्यान वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. त्यानंतर लोकल सेवा तब्बल २.४५ तासांनी म्हणजे १०.४५ वाजेपासून सुरू झाली. या घटनेमुळे लोकलचे वेळापत्रक पार कोलमडले. आधीच उन्हाचा तडाखा, त्यात लोकल सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. या काळात लोकलच्या अनेक सेवा रद्द करण्यात आल्याने ऐन गर्दीच्या वेळी सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. या घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती रेल्वेमार्फत नेमण्यात आली आहे.

कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रिकाम्या लोकलचा एक डबा घसरला. या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला. त्यामुळे कामावर निघालेल्या मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. त्यातच या घटनेबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.

घटनेचा तपास करण्यासाठी समिती नियुक्त

लोकलचे घसरलेले चाक रेल्वे रूळांवर आणण्यासाठी आणि लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तब्बल २ तास ४५ मिनीटे लागली. यावेळेत कोपर ते कल्याण लोकल सेवा ठप्प होती. या संपूर्ण घटनेची चौकशी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. या घटनेमुळे एकूण १२ लोकल पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या. तर ९ लोकल रद्द करण्यात आल्या. या मार्गावर क्रॉसओव्हर असल्याने वेगमर्यादा लावण्यात आली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी समिती नेमली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. याबाबत अधिकृत माहितीसाठी मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांना संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

अनेकांनी रेल्वे मार्गातून चालत जवळचे स्थानक गाठले

लोकलचा डबा घसरताच या लोकलच्या मागून येणाऱ्या लोकल एकापाठोपाठ एक खोळंबून उभ्या राहिल्या. त्यामुळे लोकलमधील प्रवाशांनी डब्यातून खाली उतरून रेल्वे मार्गातून चालत डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकात येणे पसंत केले. त्यामुळे सकाळच्या वेळेतच रेल्वे मार्ग प्रवाशांनी भरून गेला होता. डबा घसरल्याची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक वाहन आणि दुरुस्ती कर्मचारी अभियंते घटनास्थळी तातडीने दाखल झाले. सोमवारी कामावर जाण्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि लोहमार्ग पोलीस रेल्वे स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते.

प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने कार्यालयांमध्ये वेळेत पोहोचणे प्रवाशांना शक्य झाले नाही. या घटनेमुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा या प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. धीम्या मार्गावरील लोकल बराच काळ येत नसल्याने प्रवाशांना कार्यालयात वेळेवर पोहोचणे अशक्य झाल्याने लेटमार्क लागला. लोकल येत नसल्याने अनेकांनी रेल्वे स्थानकांबाहेर येऊन पर्यायी मार्गाने कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाच्या काळात सकाळी लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत होते. मात्र त्या अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ विलंबाने धावत होत्या, असे प्रवाशांनी सांगितले.

सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर; रुग्णसेवेसह शासकीय कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

मोदीविरोधातून महिलाविरोधाकडे

आजचे राशिभविष्य,२१ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

औद्योगिक जमिनींसाठी GST सारखी स्वतंत्र परिषद हवी; नियमात सुसूत्रता आणण्यासाठी 'सीआयआय'ची शिफारस

जम्मू-काश्मीर बस अपघात: उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी