ठाणे

कर्जत तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले; सख्ख्या भावानेच केली हत्या; पांढऱ्या शर्टवरून आरोपी गजाआड

सख्खा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलाला ठार मारणारा हनुमंत पाटील याला पोलिसांनी तपासादरम्यान अखेर अटक केली. त्यानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Swapnil S

अलिबाग : कर्जत येथील तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. सख्खा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलाला ठार मारणारा हनुमंत पाटील याला पोलिसांनी तपासादरम्यान अखेर अटक केली. त्यानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी आरोपीची सलग ३६ तास चौकशी करण्यात आली. त्यामध्ये आरोपीने हत्या करताना वापरलेला शर्ट आणि नंतर त्याने परिधान केलेला टी-शर्ट याच्यामध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालमत्तेच्या वादातून हनमुंत पाटील याने अतिशय थंड डोक्याने तिघांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. आरोपीचे कृत्य पूर्वनियोजित असून अत्यंत क्रूरपणे त्याने तिघांची हत्या केली. सदरचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून आरोपीला फाशी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचेही घार्गे यांनी स्पष्ट केले.

८ सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गावातील नदीमध्ये आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला होता. गावात मुलाचा मृतदेह नेला असता मुलाचे आई-वडील घरात नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता त्याच नदीच्या पात्रामध्ये मुलाच्या आईचा तसेच काही अंतरावर वडिलांचा मृतदेह सापडला. मदन पाटील, माधुरी पाटील आणि त्यांचा मुलगा या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आले होते.पोलिसांनी संशयित म्हणून मृत मदन पाटील याच्या शेजारी राहणारा त्याचा सख्खा भाऊ हनुमंत पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यावेळी आरोपीने परिधान केलेला शर्ट आणि सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिसांना एक धागा सापडला. पोशीर येथील एका शाळेमध्ये सीसीटीव्ही आहे. त्यामध्ये तो कैद झाला, हत्या करताना त्याने पांढरा शर्ट परिधान केला होता. हत्या करून परतताना त्याच्या अंगात टी-शर्ट असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कर्जत पोलीस विभागीय अधिकारी धुळा टेळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, नेरळचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली.

तिघांचा नाही, तर चौघांचा खून

भावाच्या घरात गणपती असल्याने दरवाजा उघडा होता. याचा फायदा घेऊन त्याने रात्री भावासह त्याची पत्नी आणि मुलाच्या डोक्यात वार करून त्यांना ठार मारले. त्यानंतर घटनास्थळावरील पुरावे नष्ट केले. तिन्ही मृतदेहांना त्याने ठरावीक अंतरावर नदीत फेकून दिले. राहत्या घरामध्ये हिस्सा आणि रेशन कार्डवरील धान्य मिळत नसल्याने सख्ख्या भावाचे कुटुंब संपवल्याची कबुली त्याने दिली. त्याने तिघांचा नाही, तर चौघांचा खून केला आहे. कारण, मृत माधुरी ही सात महिन्यांची गरोदर होती.

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Cyber Fraud Alert : तुम्हालाही व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान... APK फाइलमुळे क्षणात खातं होईल रिकामं

दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी ५ जणांवर गुन्हा, सहलीत निष्काळजीपणा; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

डेटा लीकप्रकरणी HDFC बँक अधिकाऱ्यांची चौकशी