ठाणे : ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. लोकमान्यनगर येथील क्लस्टर योजनेच्या बैठकीवरून सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘माझा लढा व्यासपीठ किंवा निमंत्रणासाठी नाही, तर सामान्य ठाणेकरांच्या हक्कासाठी आहे,’ असे दिघे यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिका हद्दीतील अनेक एसआरए प्रकल्प रखडले असून, या प्रकल्पांमुळे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचा प्रश्न अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत महापालिका मोठ्या प्रमाणावर क्लस्टर योजना राबवत असताना तिच्या अंमलबजावणीवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल दिघे यांनी केला आहे. रखडलेल्या एसआरए प्रकल्पांवर ठोस तोडगा काढण्यापूर्वी क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीची हमी काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला..
क्लस्टर आणि मेट्रोच्या नावाखाली बिल्डरांचे हित साधू देणार नाही. जुन्या व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे; मात्र त्यात सामान्य नागरिकांच्या घराची आणि मूलभूत सुविधांची सुरक्षा महत्त्वाची आहे.
वाढत्या लोकसंख्येसाठी सुविधा कुठून आणणार?
क्लस्टर पुनर्विकासामुळे अतिरिक्त लोकसंख्या वाढणार आहे. या वाढत्या लोकसंख्येसाठी पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि पार्किंगच्या सुविधा पुरेशा आहेत का, असा सवाल दिघे यांनी केला. उंच इमारतींत स्थलांतरित होणाऱ्या रहिवाशांना भविष्यातील देखभाल खर्च परवडणार आहे का, असे ते म्हणाले.
रिंग मेट्रोचा फायदा कोणाला?
ठाण्यात प्रस्तावित रिंग मेट्रो प्रकल्प सामान्य ठाणेकरांच्या वाहतूक सुविधेसाठी आहे की क्लस्टरमधील उंच इमारतींच्या विकासाला चालना देण्यासाठी, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या घरांचा आणि रोजगाराचा प्रश्नही स्पष्ट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
डीपी रोडआधी पुनर्वसन का नाही?
विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचाही मुद्दा दिघे यांनी उपस्थित केला आहे. रस्ते रुंदीकरणामुळे घरांवर कारवाई करण्यापूर्वी बाधितांना हक्काचे घर आणि मालकी हक्क देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून रस्ते मोकळे करण्याची घाई का, असा सवालही त्यांनी केला.