Thane : भाजप-शिवसेनेमध्ये अंतर्गत राजकारण उफाळले 
ठाणे

Thane : भाजप-शिवसेनेमध्ये अंतर्गत राजकारण उफाळले

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा उफाळून आले आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा उफाळून आले आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मतांचे संख्याबळ भाजपकडे असल्याचा दावा करत स्थानिक भाजप नेत्यांनी ही जागा पक्षालाच मिळावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघात माघार घेतल्यानंतर आता आणखी तडजोड नको, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेत पुन्हा राजकीय तणाव समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ आमदारांपैकी भाजपचे नऊ आमदार असून शिंदे सेनेचे सहा आमदार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी ठाणे लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघासाठीही भाजपने दावा केला होता. मात्र महायुतीच्या जागावाटपात या दोन्ही जागा शिंदे सेनेला देण्यात आल्या. त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याची तयारी सुरू केली आहे.

या मतदारसंघात भाजपकडे ४४४ मतांचे संख्याबळ असल्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे शिंदे सेनेकडे ३२६ मते असून नुकतेच त्यांच्या गटात सहभागी झालेल्या निलेश सांबरे यांच्या गटाची २० मते धरल्यास त्यांची एकत्रित ताकद ३४६ होते. त्यामुळे भाजपकडून ज्याचे संख्याबळ जास्त, उमेदवारी त्यालाच हा मुद्दा जोरात पुढे आणला जात आहे.

जागेसाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार

भाजप आमदार संजय केळकर यांनीही पक्षाची भूमिका उघडपणे मांडली आहे. ठाणे लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघात भाजपची ताकद असूनही पक्षाने माघार घेतली होती. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपच सर्वाधिक मजबूत स्थितीत असल्याने ही जागा भाजपलाच मिळावी, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे अधिकृत मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai : धरणक्षेत्रात पाऊसधारा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७३ टक्क्यांनी वाढ

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी