मुरबाड : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुरबाड तालुक्यात बारवी, काळू धरणांसह अनेक लहान-मोठे बंधारे आणि नद्यांचे जाळे असूनही पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आणि परतीच्या पावसाने लवकर माघार घेतल्याने दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी वाड्या-पाड्यांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे.
मुरबाड तालुक्यातील १२६ ग्रामपंचायती आणि २०७ महसुली गावांच्या परिसरात दरवर्षी डिसेंबरपासून जूनपर्यंत पाणीटंचाई जाणवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सुमारे २२ गावे आणि ३४ वाड्या-पाड्यांतील आदिवासी वस्त्यांना या समस्येचा विशेष फटका बसतो. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याचा आरोप शेतकरी आणि ग्रामस्थांकडून केला जात आहे.
१९७२ च्या दुष्काळातून धडा घेण्याची गरज
महाराष्ट्राने १९७२ मध्ये भीषण दुष्काळाचा सामना केला होता. नाल्यांवर छोटे मातीचे बंधारे बांधणे, पावसाचे पाणी अडवणे, विहिरी आणि तलावांतील पाणीसाठ्याचे संरक्षण करणे तसेच पाण्याचा अनावश्यक उपसा रोखणे आवश्यक आहे. प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे आणि जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे.
साठवणुकीचे नियोजन कुठे?
तालुक्यात काळू, शाई, डोंईफोडी, मुरबाडी आणि कनकविरा यांसारख्या नद्या वाहतात. मात्र, उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याची तक्रार आहे. काळू नदीतील पाण्याचा वीटभट्ट्या, फार्महाऊस, बागायती आणि बांधकामांसाठी उपसा होत असल्याचे स्थानिक सांगतात. नदीपात्रांतील उत्खननावर नियंत्रण ठेवण्याची मागणीही होत आहे. दरम्यान, संभाव्य दुष्काळी परिस्थिती असतानाही जलसंधारणाच्या उपाययोजनांना पुरेशी गती मिळाली नसल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीत व्यस्त असलेल्या स्थानिक नेत्यांनी पाणीप्रश्नाकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.