ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात काही आरोपींना अटक झाली असली, तरी हत्येशी संबंधित असल्याचे आरोप होत असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींविरोधात पोलीस कारवाई का होत नाही? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी ठाण्यात उपस्थित केला. पोलीस दात नसलेल्या वाघासारखे का पाहत बसले आहेत? असा सवाल करत त्यांनी तपासाच्या दिशेवर प्रश्न उपस्थित केला.
पूर्णेकर हे पक्षाचे कडवट शिवसैनिक होते, असा दावा अंधारे यांनी केला. क्लस्टर प्रकल्पातील गोरगरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे आणि या प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी ते लढत होते, असेही त्यांनी सांगितले.
आरोपीच्या जबाबाची सत्यता तपासावी
माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी या प्रकरणात अंधारे यांनी केली. एका आरोपीच्या जबाबात मीनाक्षी शिंदे यांचे नाव आल्याचा दावा करत त्याची सत्यता तपासावी, असे त्या म्हणाल्या. पाच कोटींच्या व्यवहाराची माहिती आम्हाला मिळाली आहे. पोलिसांनी या माहितीची सत्यता तपासावी, असा दावा अंधारे यांनी केला.
पूर्णेकर हत्येचा योग्य तपास होईल; ज्योती वाघमारे यांचा विश्वास
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा महाराष्ट्र पोलीस निष्पक्षपणे तपास करून सत्य बाहेर आणतील, असा विश्वास शिवसेना (शिंदे गट) राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ते पोलिसांसमोर सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.
पूर्णेकर हत्या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. तपासात आम्ही निष्पक्ष भूमिका घेऊ. मात्र, एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांना आधार देण्याऐवजी या घटनेचे राजकारण केले जात आहे, असा आरोप वाघमारे यांनी केला. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असून महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारे राजकारण केले जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, दिशा सालियान
प्रकरणाचाही त्यांनी संदर्भ देत या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नावे असल्याचा दावा केला. तसेच पूर्णेकर हत्या प्रकरणासह विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली असतानाही त्यांच्यावर आरोप केले जात असल्याचे वाघमारे म्हणाल्या. पूर्वी औरंगजेबाच्या सैन्याला पाणी पितानाही संताजी-धनाजी दिसायचे. तसे आता यांना प्रत्येक गोष्टीत एकनाथ शिंदे दिसतात. आमच्या पक्षातील महिलेला बदनाम करू नका, असे आवाहन करत हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे असून तपासातून सत्य समोर येईल.ज्योती वाघमारे, खासदार शिंदे सेना