जीव वाचवणाऱ्यालाच मृत्यूने गाठले! मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ TDRF जवानाचा दुर्दैवी अंत 
ठाणे

जीव वाचवणाऱ्यालाच मृत्यूने गाठले! मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ TDRF जवानाचा दुर्दैवी अंत

भिवंडीच्या कोहिनूर इमारत दुर्घटनेत नुकत्याच पार पडलेल्या बचावकार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान विकास लहानू गोरे (३१) यांचा खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला आहे.

Krantee V. Kale

ठाणे : भिवंडीच्या कोहिनूर इमारत दुर्घटनेत नुकत्याच पार पडलेल्या बचावकार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान विकास लहानू गोरे (३१) यांचा खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ त्यांच्या मोटारसायकलचा मोठ्या खड्ड्यामुळे अपघात झाला. गोरे हे २०१९ पासून ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलात (टीडीआरएफ) कार्यरत होते.

पोलीस आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे हे दुचाकीवरून कामावर जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावरील भारंगी नदीच्या पुलावर खड्डा चुकवताना अपघात घडला. पावसाने ओलसर झालेल्या महामार्गावरील एका खोल खड्ड्याचा त्यांना अंदाज आला नाही.

तथापि मोटारसायकल खड्ड्यात आपटल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर फेकले जाऊन थेट दुभाजकाला जोरदार धडकले. यात त्यांच्या शरीराच्या खालील भागाला गंभीर दुखापत झाली. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांनी त्यांना तत्काळ शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

'ड्युटीवरून आल्यावर मुलीला दवाखान्यात घेऊन जाऊ'

अपघातापूर्वी विकास गोरे यांची पत्नी कविता यांच्याशी शेवटची बातचीत झाली होती. त्यांच्या जुळ्या मुलींपैकी एकीची प्रकृती बिघडल्याने, "ड्युटीवरून परत आल्यावर आपण तिला दवाखान्यात घेऊन जाऊ," असे विकास यांनी पत्नीला सांगितले होते. मात्र, काही तासांतच त्यांच्या अपघाताची बातमी समजली.

"माझ्या पतीचा मृत्यू नियतीमुळे नाही, तर रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाला. आमच्या दीड वर्षांच्या जुळ्या मुलींचे भविष्य सरकारने सुरक्षित करावे आणि आम्हाला आर्थिक मदत द्यावी." असे कविता यांनी म्हटले.

'इतरांचे जीव वाचवत होता पण प्रशासनाने त्याचाच जीव घेतला'

विकास यांच्या आई कुंदाबाई गोरे यांनी या घटनेसाठी प्रशासनालाच जबाबदार धरले. "माझा मुलगा आयुष्यभर इतरांचे प्राण वाचवत होता. पण प्रशासनाला सुरक्षित रस्तेही देता आले नाहीत. सरकारने आमच्या कुटुंबाला मदत करावी आणि घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी," अशी मागणी त्यांनी केली.

'असंख्य जीव वाचवणारा जवान खड्ड्याचा बळी'

विकास गोरे हे २०१९ पासून टीडीआरएफमध्ये कार्यरत होते आणि २०२४ मध्ये त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती झाली होती. टीडीआरएफ अधिकारी सचिन दुबे यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेच्या बचावकार्यात विकास यांनी महत्त्वाची भूमिका बजावत ढिगाऱ्याखालून सुमारे दहा मृतदेह बाहेर काढण्यात मोलाचे योगदान दिले होते.

"अशा धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ जवानाचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी आहे," असे दुबे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले.

महामार्गावरील खड्ड्यांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप केला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

Pune : "मुलीला घेऊन जा, नाहीतर..." जावयाचा रात्री फोन अन् काही तासांत IT इंजिनिअर वैष्णवीचा मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा आरोप

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ५ लाखांची मागणी, डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण; अखेर अटक

SEBI कडे ९ कंपन्यांचे आयपीओसाठी अर्ज