ठाणे : ठाणे शहराला ‘हरित शहर’ बनविण्याच्या घोषणा एकीकडे होत असतानाच दुसरीकडे विकासकामांच्या नावाखाली शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालविण्याची तयारी सुरू आहे. ठाणे रिंग मेट्रो, रस्ते रुंदीकरण, मेट्रो स्टेशन आणि ट्विन टनेलसह विविध प्रकल्पांसाठी ८००हून अधिक झाडे तोडण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात ५० ते ८५ वर्षे वयाची झाडे आणि अनेक हेरिटेज वृक्षांचाही समावेश आहे.
रिंग मेट्रो प्रकल्पासाठी रायलादेवी तलाव ते बाळकुमदरम्यान ३२१२ झाडे बाधित होत आहेत. यापैकी ५१९ झाडे तोडण्यास, तर २६९३ झाडांचे पुनर्रोपण करण्यास वृक्षप्राधिकरणाने मान्यता दिली आहे. यातील नऊ हेरिटेज वृक्षांबाबतचा निर्णय मात्र राखून ठेवला आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या या निर्णयांचा गोषवारा आता महासभेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
ठाणे शहरातील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो उभारण्यात येणार आहे. या कामासाठी बाधित होणाऱ्या झाडांमध्ये वड, पिंपळ, रेनट्री, आंबा, जांभूळ, कडुनिंब, कदंब, उंबर, फणस यांसारख्या मोठ्या वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांपैकी काहींचे वय ६० ते ७५ वर्षांपर्यंत असल्याचे प्रस्तावात नमूद केले. ही झाडे तोडली गेल्यास त्यांची पर्यावरणीय भरपाई केवळ नवीन रोपे लावून होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या मुख्यालयासाठीही झाडांचा बळी
मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी, तर ८५ वर्षांचा वड, ५० वर्षांचा पिंपळ आणि ५५ वर्षांचा वड बाधित होत आहेत. या तीनही झाडांना तोडण्यास मान्यता देण्यात आली आहे.
झाडांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेनेच आपल्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी तीन मोठी झाडे तोडण्यास मंजुरी दिली आहे. या झाडांचे एकत्रित वय १९० वर्षे आहे. त्यांच्या बदल्यात १९० नवीन वृक्षांचे रोपण करण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, ८५ वर्षांच्या वडाची जागा ८५ नवीन रोपे घेऊ शकतील का? असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला.
आकडे धडकी भरवणारे!
प्रकल्प - वृक्षतोड
रिंग मेट्रो - ३२१२
रस्ते रुंदीकरण - १६७
ट्विन टनेल - १५९
मनपा मुख्यालय - ३
टनेलसाठी १५९ झाडे तोडणार
एमएमआरडीएच्या कामात २२० झाडे बाधित होत असून, त्यातील ६१ झाडांचे पुनर्रोपण आणि १५९ झाडे तोडण्यास मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणीही ८० वर्षांचा वड आणि दोन ८० वर्षांचे आंबे हेरिटेज वृक्ष म्हणून नोंदवण्यात आले आहेत. या तिन्ही वृक्षांबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
पर्यावरणाची किंमत किती?
वृक्षतोडीच्या बदल्यात भरपाई वृक्षारोपणासाठी संबंधित प्रकल्पांकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षा अनामत रक्कम घेण्यात येणार आहे. रिंग मेट्रो प्रकल्पासाठी ३७,१८४ वृक्षांच्या संगोपनासाठी १८ कोटी ५९ लाख २० हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. इतर प्रकल्पांसाठीही कोट्यवधी रुपयांच्या सुरक्षा ठेवीची तरतूद करण्यात आली आहे.
हेरिटेज वृक्षांवरील निर्णय राखीव
वृक्षप्राधिकरणाने प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी टप्प्याटप्प्याने वृक्षतोड आणि पुनर्रोपणाची परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हेरिटेज वृक्षांबाबत अंतिम निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. कारण हे वृक्ष ५० ते ८० वर्षे जुने आहेत. त्यामुळे पर्यावरण राखले जाते.
१६७ झाडांची कत्तल
ओवळा-माजिवड्यातील रस्ते रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामात २९१ झाडे बाधित होत आहेत. यातील १२४ झाडांचे पुनर्रोपण, तर १६७ झाडे तोडण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकरणातही नऊ हेरिटेज वृक्ष आढळले आहेत.
मेट्रोसाठी पिंपळाच्या फांद्या तोडणार
तीन हात नाका, आरटीओ, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन आणि माजिवडा परिसरातील मेट्रो स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी २४ झाडे बाधित होत आहेत. यातील दोन झाडे तोडण्यास आणि २१ झाडांचे पुनर्रोपण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यातील ८० वर्षांच्या पिंपळाच्या हेरिटेज वृक्षाच्या फांद्या छाटण्यास मंजुरी देण्यात आली आहे.