नवी मुंबई : ऐरोली-काटई नाका पुलाच्या ठाणे-बेलापूर मार्गावरील गर्डर टाकण्याचे काम एमएमआरडीएकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबर तसेच ९, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
ऐरोली येथील भारत बिजली आणि सिमेन्स कंपनीजवळ पुलावर गर्डर टाकण्याचे काम होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून ये-जा करण्यास तसेच पार्किंग करण्यास मनाई असेल.
कामाशी संबंधित एमएमआरडीएची वाहने मात्र या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.
ठाण्याकडून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या सहा चाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांना दिघा येथील मुकुंद कंपनीपासून एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याने पुढे जाता येईल. चारचाकी वाहनांनी भारत बिजली चौकातून उजवीकडे वळून ऐरोली फायर ब्रिगेड चौक, खेडेकर चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
बेलापूरहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी रबाळे नाका सिग्नलवरून उजवीकडे वळून एमआयडीसी अंतर्गत रस्त्याने मुकुंद कंपनीमार्गे पुढे जावे. पटणीमार्गे जाणाऱ्या वाहनांसाठी रबाळे नाका-दिवागाव सर्कल-पटणी रोड हा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी केले.