ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाला सुरुवात X
ठाणे

ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाला सुरुवात

मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी पहिल्या टनेल बोअरिंग मशीन अर्थात बोगदा खोदाई यंत्राचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी पहिल्या टनेल बोअरिंग मशीन अर्थात बोगदा खोदाई यंत्राचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.

हे मुंबईत वापरले जाणारे आतापर्यंतचे सर्वात मोठे मशीन असून, यासोबतच भूमिगत उत्खननाच्या कामाला पूर्णवेळ सुरुवात झाली आहे. हे मशीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राखाली उत्खनन करून बोरिवलीतील एकता नगर ते ठाण्यातील मानपाडा (टिकुजीनी वाडी) यांना जोडणारे दुहेरी बोगदे तयार करतील.

या भव्य टीबीएमचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्पाशी संबंधित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘नायक’ टीबीएम दररोज १० मीटर उत्खनन करेल. ठाणे बाजूने 'नायक' आणि 'अर्जुन' हे प्रत्येकी ६.०९ किमी बोगद्याचे काम करतील, तर बोरीवली बाजूने येणारे टीबीएम प्रत्येकी ५.७५ किमी लांबीचे उत्खनन करतील.

हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर नाशिक, कल्याण आणि नवी मुंबईतून येणारी वाहने ठाणे शहर टाळून थेट या बोगद्याचा वापर करून मुंबईत येऊ शकतीवल. बोरीवलीच्या बाजूने उड्डाणपुलाशी जोडणी केल्यामुळे दहिसर, अंधेरी आणि बोरीवली पश्चिमकडे जाणे सोपे होईल.

बोगदा खोदणारा नायक

या यंत्राला 'नायक' असे नाव देण्यात आले आहे. ११.८४ किमी लांबीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या चार महाकाय 'सिंगल-शील्ड हार्ड-रॉक' टीबीएमपैकी पहिले मशीन आहे. तामिळनाडूतील अलिंजीवाक्कम येथील 'हरेनक्नेक्ट एजी' कंपनीत तयार करण्यात आलेले हे मशीन 'मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' ने खरेदी केले आहे. ही कंपनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी या प्रकल्पाचे काम करत आहे. नायक या मुख्य यंत्रासह चारही टीबीएमला १३.२ मीटर व्यासाचा प्रचंड 'कटरहेड' बसवण्यात आला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या कामात वापरला जाणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचा कटर आहे. यापूर्वी कोस्टल रोडसाठी वापरण्यात आलेल्या 'मावळा' टीबीएमचा व्यास १२.१९ मीटर होता.

दिवस-रात्र काम सुरू राहणार

'नायक' टीबीएम तैनात झाल्यानंतर आता कामाला वेग येणार आहे. 'अर्जुन' नावाचे दुसरे टीबीएम सध्या जोडणीच्या प्रक्रियेत असून लवकरच ते समांतर बोगद्याचे काम सुरू करेल. उत्खनन आणि बोगद्याचे अस्तर लावण्याचे काम एकाच वेळी चालणार आहे.

हे काम २४ तास सुरू राहणार असून, कोणत्याही एका वेळी सुमारे ३०० कामगार साइटवर तैनात असतील. टीबीएमच्या कामावर सीसीटीव्ही आणि लाइव्ह डेटा फीडद्वारे नियंत्रण कक्षातून सतत लक्ष ठेवले जाईल.

प्रवासाच्या वेळेत मोठी बचत

हा बोगदा पूर्ण झाल्यावर ठाणे ते बोरीवली दरम्यानचा प्रवास जो सध्या ६० ते ९० मिनिटे लागतो, तो अवघ्या १५ मिनिटांवर येईल. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबई महानगर प्रदेशातील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होईल.

ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा – मुख्य वैशिष्ट्ये:

  • एकूण प्रकल्पाची लांबी : ११.८४ किमी

  • दुहेरी बोगद्याची लांबी : १०.२५ किमी

  • जोड रस्ते : १.५९ किमी

  • बोगदा रचना : २ ट्रॅफिक लेन्स + १ आपत्कालीन लेन (प्रत्येक बोगद्यात)

  • सुरक्षितता : दर ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेज

  • प्रगत टीबीएम : १३.३४ मीटर व्यास, वजन सुमारे २,५०० टन

  • खोली : जमिनीखाली सुमारे २३ मीटर

  • पर्यावरण : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली संवेदनशील बांधकाम; नुकसान भरपाई म्हणून ११,००० वृक्षांची लागवड केली जाणार.

  • सुविधा : मेकॅनिकल व्हेंटिलेशन, अग्निशमन यंत्रणा आणि धूर शोधणारी यंत्रणा

  • वाहतूक क्षमता : २०२९ पर्यंत दररोज अंदाजे ८०,००० वाहने.

सर्वात लांब शहरी बोगदा

हा प्रकल्प ११.८४ किमी लांबीचा भूमिगत कॉरिडॉर असून तो भारतातील सर्वात लांब शहरी रस्ते बोगदा ठरणार आहे. प्रत्येकी तीन पदरी (लेन्स) असलेले हे दुहेरी बोगदे जमिनीपासून २३ मीटर खोलीवर बांधले जातील. सुरक्षितता आणि देखभालीसाठी दर ३०० मीटरवर 'क्रॉस-पॅसेज' (जोड रस्ते) बांधले जातील.

CJP ची दिल्लीत उद्या तिरंगा रॅली; सरकार देशात अघोषित आणीबाणी लादतंय - अभिजित दीपकेंचा आरोप

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर होणार कारवाई, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

विहिरी, बोअरवेलने गाठला तळ; ग्रामीण जनजीवन विस्कळीत होण्याची भीती

... तर द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील; भारत-चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्पष्ट इशारा

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर