ठाणे : येथील कोपरी रेल्वे पुलावर उन्नत मार्गिकेच्या खांबाच्या बांधकामासाठी उभारलेला शेकडो लोखंडी सळ्यांचा सांगाडा अचानक रस्त्याच्या दिशेने कोसळला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या एका कारच्या पुढील काचेचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ठाण्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. या घटनेची गंभीर दखल घेत एमएमआरडीएने संबंधित कंत्राटदाराला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचे स्पष्ट केले आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोपरी-आनंदनगर ते साकेत पुलादरम्यान उन्नत मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी कोपरी रेल्वे पुलाजवळ खांब उभारले जात आहेत. त्यासाठी लोखंडी सळयांचा सांगाडा तयार करण्याचे काम सुरू असताना तो अचानक एका बाजूला झुकून रस्त्याच्या दिशेने कोसळला. याचवेळी तेथून जाणाऱ्या कारवर सळयांचा भाग आदळल्याने तिचे नुकसान झाले.
ठाणे शहर आणि परिसरात एमएमआरडीएकडून मेट्रो, उन्नत मार्गिका तसेच ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र, या कामांदरम्यान बांधकाम साहित्य कोसळणे आणि वाहनांचे नुकसान होण्याच्या घटना यापूवीर्ती घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी याच उन्नत मार्गिकेच्या कामादरम्यान सिद्धेश्वर तलाव परिसरात क्रेन संरक्षक अडथळ्यावर कोसळली होती. त्यानंतर अडथळा रिक्षावर पडल्याने प्रवासी जखमी झाला होता.
चौकशीचे आदेश
या घटनेची एमएमआरडीएने गंभीर दखल घेतली आहे. बांधकामातील सुरक्षेबाबत कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. घटनेचे नेमके कारण आणि सुरक्षाविषयक त्रुटी शोधण्यासाठी सखोल चौकशीचे आदेश दिले. संबंधित कंत्राटदाराला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचेही एमएमआरडीएने नमूद केले आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणीचे आश्वासन प्राधिकरणाने दिले आहे.