अतुल जाधव/ठाणे
यंदा जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्यातील शेतीचे अर्थकारण कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. जिल्ह्यात भातपिकाचे २५ ते ३० टक्के नुकसान झाले असून, नाचणी आणि वरईच्या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. या दोन्ही पिकांचे तब्बल ९० ते ९५ टक्के नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच जमिनीतील ओलावा कमी झाल्याने हरभरा, वाल आणि भाजीपाला लागवडीवरही मर्यादा येणार असल्याने रब्बी हंगामही संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागात भातशेती हा शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. मात्र, पावसाने सुरुवातीपासूनच सातत्य राखले नाही. विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने भातशेतीला मोठा फटका बसला. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली असून, अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे भातपिकाचे २५ ते ३० टक्के नुकसान होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
नुकसान आर्थिक, अन्नसुरक्षेबाबतही
भातशेतीच्या तुलनेत नाचणी आणि वरई उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. जिल्ह्यातील डोंगराळ आणि आदिवासीबहुल भागात या पिकांचे क्षेत्र मोठे आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच जमिनीतील ओलावा घटल्याने पिकांची वाढच समाधानकारक झाली नाही. परिणामी नाचणी आणि वरईच्या उत्पादनात ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. या पिकांवर आदिवासी कुटुंबांची उपजीविका व धान्याची गरज अवलंबून असल्याने नुकसानीचे परिणाम आर्थिक पातळीवरच नव्हे तर अन्न सुरक्षेवरही होण्याची भीती आहे.
पंचनामे करणे आवश्यक
जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट होण्यासाठी कृषी विभागाने पीकनिहाय सर्वेक्षण करून पंचनामे करणे आवश्यक आहे. भात, नाचणी आणि वरईच्या नुकसानीचे स्वतंत्र मूल्यांकन करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
रब्बीच्या पेरणीसाठी पुन्हा भांडवल कसे उभे करणार
अल्पभूधारक आणि आदिवासी शेतकऱ्यांना या संकटाची झळ बसणार आहे. खरीपातून अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने रब्बीच्या पेरणीसाठी पुन्हा भांडवल उभे करणेही कठीण होणार आहे.
पावसाच्या लहरीपणाचा फटका
यंदा पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहिलेला नाही. त्यामुळे हरभरा आणि वाल या पिकांच्या लागवडीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेरणी केली तरी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला ओलावा उपलब्ध होईल का, याची शाश्वती नाही. खरीपपाठोपाठ रब्बीतील उत्पादनही घटण्याचे संकेत आहेत. मशागत, बियाणे, खते, मजुरी आणि अन्य शेतीकामांसाठी आधीच मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)