एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा ANI | प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागल्याची चर्चा सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची विक्री तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा पुरेशा प्रमाणात सुरू असल्याचा दावा शिधावाटप विभागाकडून करण्यात आला आहे.

Swapnil S

ठाणे : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागल्याची चर्चा सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची विक्री तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा पुरेशा प्रमाणात सुरू असल्याचा दावा शिधावाटप विभागाकडून करण्यात आला आहे.

असे असले तरी मागील काही दिवसांत ठाणे शिधावाटप परिमंडळ ‘फ’ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरची बुकिंग थेट दीड लाखांच्या आसपास गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गुरुवारी एका दिवसात तब्बल ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण ग्राहकांना करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून या वाढत्या तणावामुळे खनिज तेल आणि गॅस वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून देशातील काही भागात गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत असल्याचेही चित्र दिसून येत आहे.

सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा मर्यादित करण्यात आला आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरचा नियमित पुरवठा सुरू आहे. गॅसबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे बुकिंगची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. तरीही गुरुवारी एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
प्रशांत काळे, उपनियंत्रक शिधावाटप, फ परिमंडळ, ठाणे

कंट्रोल रूमची स्थापना

ठाणे ‘फ’ परिमंडळातील ७२ गॅस एजन्सींमार्फत घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार नागरिकांना किंवा हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलिंडरचा काळाबाजार आढळल्यास तक्रार करता यावी, यासाठी ८१६९२३०६६५ हा तक्रार क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा

ठाण्यात दररोज सुमारे ८० ते ९० हजार लिटर पेट्रोल आणि ६० ते ७० हजार लिटर डिझेलचा साठा उपलब्ध होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Maharashtra Weather Update : पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; उष्णतेची लाट ओसरली, ‘यलो अलर्ट’ जारी

नाशिकमध्ये वृक्षतोडीवर १९ जूनपर्यंत स्थगिती कायम; पूर्वपरवानगीशिवाय तोड बंद, महापालिकेला धक्का

मराठी भाषा सक्तीचे पाऊल अडखळले; प्रताप सरनाईक यांची माहिती

भोंदू अशोक खरात प्रकरण : पाच हजारांच्या अंगठीची विक्री ‘लाख’मोलात; SITकडून महिलेच्या नावाचा मोठ्या रकमेचा धनादेश जप्त

दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोलाला भारतात आणले