मुंब्र्यात पुन्हा गोळीबार! मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या संतापातून फायरिंग; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी 
ठाणे

मुंब्र्यात पुन्हा गोळीबार! मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या संतापातून फायरिंग; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी; Video

मुंब्र्यात मानलेल्या बहिणीच्या छेडछाडीवरून संतापलेल्या व्यक्तीने तिघांवर गोळीबार केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Mayuri Gawade

ठाणे तसेच मुंब्रा परिसरात गेल्या काही दिवसांत गोळीबाराच्या घटना घडत असतानाच गुरुवारी (दि. ०२) पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला. मुंब्र्यातील कैलासनगर परिसरात एका व्यक्तीने तिघांवर गोळ्या झाडल्याने खळबळ उडाली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.

मानलेल्या बहिणीची छेड काढली अन्...

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील बिस्मिल्ला चाळ, रूम क्रमांक २ येथे ही घटना घडली. जयन शिवानंदन नायर (५१), हा माजी लष्करी कर्मचारी असल्याची माहिती असून, त्याच्या मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून काही जणांशी त्याचा वाद सुरू होता. हा वाद चिघळल्यानंतर संतापाच्या भरात नायरने गोळीबार केला.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने अंदाजे पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात अब्दुल हसन शेख (४५), अकबर अब्दुल शेख (२९) आणि समीर अहमद शेख (३२) हे तिघे गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

एकाचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू

जखमींना तात्काळ मुंब्र्यातील कळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. बाकी दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

पोलिसांची तातडीची कारवाई

घटनेनंतर मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी जयन शिवानंदन नायर याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र जप्त करण्यात आलं असून ते फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच संयुक्त पोलिस आयुक्त, उपायुक्त (DCP) तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पुरावे गोळा करून गोळीबाराची संपूर्ण साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

तपास सुरू

"आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेण्यात आलं आहे. प्राथमिक कारण हे नातलगाशी संबंधित वाद असल्याचं दिसत असलं तरी इतर शक्यताही तपासल्या जात आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

या घटनेमुळे कैलासनगर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

अभिजीत दीपकेंना सशर्त जामीन; शांतता बंधपत्र देण्याचे आदेश

इंटरनेट हा मुलांचा मूलभूत हक्क; सरसकट बंदी घालण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

रामलीला मैदानावर काँग्रेसची १ नोव्हेंबरला रॅली

भारताला तेल दिलासा; प्रस्तावित १०० टक्के टॅरिफला स्थगिती

Thane : पुलाचा लोखंडी सांगाडा कारवर कोसळला; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड