ठाणे : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळावे, यासाठी ठाणे महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील आणखी ७० वर्गखोल्या डिजिटल करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. यासाठी तब्बल १ कोटी ९९ लाख ४६ हजार ४३० रुपये खर्च अपेक्षित असून, या खर्चाला प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यासह निविदा काढण्याचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून टप्प्याटप्प्याने वर्गखोल्या डिजिटल करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या ६९ शाळांच्या इमारतींमध्ये अध्यापनासाठी एकूण ६३७ वर्गखोल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४५५ वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित १८२ वर्गखोल्या आगामी काळात टप्प्याटप्प्याने डिजिटल करण्याचे नियोजन आहे.
२०१९-२० मध्ये पहिल्या टप्प्यात १०० शाळांमधील २०० वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आणखी ८३ वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या. २०२५-२६ या वर्षात ७२ वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या असून, सीएसआरच्या माध्यमातून १०० वर्गखोल्यांमध्येही डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एका वर्गासाठी सुमारे २.८५ लाखांचा खर्च
प्रस्तावित ७० वर्गखोल्यांसाठी १ कोटी ९९ लाख ४६ हजार ४३० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच एका वर्गासाठी सरासरी सुमारे २ लाख ८४ हजार ९४९ रुपये खर्च होणार आहे. हा खर्च २०२६-२७ या आर्थिक वर्षातील ‘डिजिटल क्लासरूम’ या लेखाशीर्षाखालील दोन कोटी रुपयांच्या मंजूर तरतुदीतून करण्यात येणार आहे. या डिजिटल वर्गांमध्ये ६५ इंची फ्लॅट पॅनेल, ओपन प्लगेबल स्पेसिफिकेशन संगणक, कॅमेरा, एक केव्हीए यूपीएस, रोलिंग स्टँड आणि लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचा समावेश राहणार आहे. याशिवाय उपकरणांची बसवणी, वाहतूक, मजुरी, देखभाल तसेच शिक्षक प्रशिक्षणाचा खर्चही प्रस्तावित दरात समाविष्ट करण्यात आला आहे.
शिक्षण व्यवस्थापनही होणार डिजिटल
लर्निंग मॅनेजमेंट सिस्टममुळे प्रवेश व्यवस्थापन, वर्ग व्यवस्थापन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, परीक्षा व्यवस्थापन तसेच सुरक्षित डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दृक्-श्राव्य माध्यमातून शिकविण्याबरोबरच अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापनही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येणार आहे. दरम्यान, ठाणे महापालिका शिक्षण क्षेत्रात आधुनिक सुविधा वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. खारेगाव येथे महापालिकेची पहिली सीबीएसई शाळाही सुरू करण्यात आली आहे.
निविदेला महासभेची मंजुरी आवश्यक
७० वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी निविदा मागविणे, निविदेच्या अटी व शर्ती निश्चित करणे तसेच १ कोटी ९९ लाख ४६ हजार ४३० रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यासाठी हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. महासभेच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून डिजिटल वर्गखोल्या उभारण्याच्या कामाला गती मिळणार आहे.