Thane : पावसामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत व्यत्यय; शहरातील काही भागांत पाणी साचले, वाहतुकीवरही परिणाम प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

Thane : पावसामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत व्यत्यय; शहरातील काही भागांत पाणी साचले, वाहतुकीवरही परिणाम

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला ठाणे शहर आणि परिसरात रविवारी पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाची दिवसभर अधूनमधून रिपरिप सुरू होती.

Swapnil S

ठाणे : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला ठाणे शहर आणि परिसरात रविवारी पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाची दिवसभर अधूनमधून रिपरिप सुरू होती. त्यामुळे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचले असून, प्रमुख मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.

ठाणे शहरात सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या सहा तासांत १८.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. माजिवडा-कापूरबावडी चौक परिसरात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक काही काळ संथ झाली. त्याचबरोबर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या. पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि शिळफाटा परिसरात वाहनांचीकोंडी झाल्याचे दिसून आले.

गणेशोत्सवासाठी शहरातील विविध गणेश मंडळांनी मंडप उभारणीची कामे जवळपास पूर्ण केली होती. मात्र, मंडपाबाहेरील आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि स्वागत कमानी उभारण्याची काही कामे शिल्लक होती. ही कामे रविवारी पूर्ण करण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते तयारीत होते. पावसामुळे मात्र सजावटीच्या साहित्याचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच पावसात काम करणे कठीण झाल्याने काही ठिकाणी कामांना तात्पुरती विश्रांती द्यावी लागली.

तरीही बाजारपेठेत उत्साह

ठाणे: गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक राहिल्याने ठाणे शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रविवारी पावसाची संततधार सुरू असतानाही गणेशोत्सवाच्या तयारीसाठी ठाणेकर मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडले. सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य तसेच विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर नागरिकांची वर्दळ होती. सोमवारी गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याने घरगुती गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आकर्षक मखर, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई, सजावटीच्या वस्तू, पूजेचे साहित्य तसेच गणेशमूर्तीला आवश्यक असलेल्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती.

दरम्यान, पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. अनेकांनी छत्र्या आणि रेनकोटचा आधार घेत खरेदी पूर्ण केली. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर गर्दी वाढल्याने नागरिकांना बाजारपेठेतून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला.

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याने विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. पावसाचा अडथळा असूनही नागरिकांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र दिसून आले. आगमनासाठी गणरायाच्या ठाणेकर सज्ज झाले असून, घराघरांत सजावट आणि पूजेची तयारी अंतिम टप्यात पोहोचली आहे.

संततधारेत बाप्पाचे आगमन

ठाणे : गणेशोत्सवाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या ठाणेकरांचा उत्साह पावसाच्या संततधारेनेही कमी झालेला दिसून आला नाही. रविवारी दिवसभर शहरात पावसाची रिपरिप सुरू असतानाही गणरायाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोमवारी गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने घरगुती गणेशमूर्तीच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पावसामुळे रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचले असतानाही नागरिक छत्र्या आणि रेनकोटच्या सहाय्याने बाजारपेठेत दाखल होत होते.

गणेशमूर्ती घेऊन घरी परतणाऱ्या नागरिकांचीही लगबग सुरू होती. पावसापासून गणेशमूर्तीचे संरक्षण करण्यासाठी नागरिक विशेष काळजी घेताना दिसून आले. काही ठिकाणी मूर्ती आणि सजावटीचे साहित्य सुरक्षितपणे घरी नेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. त्यामुळे बाजारपेठांसह प्रमुख रस्त्यांवर काही काळ गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाच्या संततधारेतही 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात ठाणेकर गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव यंदा साधेपणाने; नुकसानग्रस्त मूर्तीची लोखंडी संरचना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत

ब्रिस्टल विद्यापीठाचा मुंबईत पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस; पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत, डेटा सायन्स, आर्ट्सचे अभ्यासक्रम

Mumbai : परवाना नूतनीकरणाचा हक्क नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे

'वंदे भारत मालगाडी'ची १३० किमी वेगाने चाचणी

BRICS Summit 2026 : नवीन विमा व्यवस्थेचा व्लादिमीर पुतीन यांचा प्रस्ताव