ठाणेकरांना मिळणार मुबलक पाणी; शिलार, कुशीर धरणांची होणार उभारणी प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

ठाणेकरांना मिळणार मुबलक पाणी; शिलार, कुशीर धरणांची होणार उभारणी

ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता अपुरी पडत असल्याने भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता नव्या धरणांचा पर्याय पुढे आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुशीर आणि शिलार या दोन धरणांची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Swapnil S

ठाणे : जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता अपुरी पडत असल्याने भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता नव्या धरणांचा पर्याय पुढे आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कुशीर आणि शिलार या दोन धरणांची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येकी एक हजार दशलक्ष लिटर क्षमतेच्या या धरणांपैकी शिलार धरणाचे पाणी ठाणे शहरासाठी उपलब्ध होणार आहे. तर कालू धरणातूनही ठाणे, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरला पाणी मिळणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

ठाणे जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समस्या मांडल्यानंतर त्यांनी तातडीने बैठक आयोजित केली. त्यामध्ये नव्या जलस्रोतांबाबत चर्चा करण्यात आली. कुशीर धरणातून नवी मुंबई, पनवेल, खालापूर आणि खोपोलीला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. तर शिलार धरणातून ठाण्याची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय कालू धरणाचे कामही लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्याचा फायदा ठाणे जिल्ह्यातील शहरांना होणार आहे. हे पाणी प्रकल्प २०३१ पर्यंत प्रत्यक्षात उपलब्ध होण्याची अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.

वृक्षतोडीऐवजी स्थलांतरावर भर

मुलुंड-गोरेगाव मार्गावरील सुमारे १३०० झाडांच्या प्रस्तावित वृक्षतोडीवर बोलताना नाईक यांनी वृक्षप्रेमींच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. विकासकामांसाठी पर्यावरणाचे नुकसान कमी झाले पाहिजे. वनमंत्री म्हणून झाडे तोडण्याऐवजी त्यांचे स्थलांतर करावेत. रस्ते किंवा कालव्यांच्या कामात झाडे अडथळा ठरत असतील तर ती स्थलांतरित करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनावश्यक वृक्षतोड खपवून घेतली जाणार नाही

सूर्या धरणातून मीरा-भाईंदर आणि वसई-विरारला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार आहे. ठाणे, भाईंदर किंवा नवी मुंबई कोणत्याही शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

सिडकोतील दलालांवर निशाणा

नवी मुंबई महापालिकेला नागरिकांच्या सुविधांसाठी आवश्यक असलेले भूखंड मिळावेत यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याचे नाईक यांनी सांगितले. मात्र, भूखंड हस्तांतरणाची माहिती बिल्डरांच्या दलालांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी हालचाली सुरू केल्या. आपण याविरोधात आवाज उठवल्यानंतर सिडकोतील दलालांचे प्रमाण कमी झाले असले तरी त्यांचे अस्तित्व अजूनही असल्याचा आरोप त्यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'हापूस'वर गुजरातचा डोळा; नावावर वलसाडची दावेदारी, बाजारपेठ काबीज करण्याचा डाव

'गोकुळ'च्या अध्यादेशासाठी मोजले ८० लाख! राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना देयक अदा

साखर कारखानदारीला 'घरघर'! ऊस गाळप करणाऱ्या राज्यातील सहकारी कारखान्यांची संख्या १०० च्या आत, कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष समिती

Mumbai : उद्यान, मैदानात आता राज्य सुरक्षा मंडळाचे जवान तैनात; अमित साटम यांची आयुक्तांबरोबर बैठक संपन्न

Mumbai : बांधकामस्थळी सेफ्टी नेट बंधनकारक; तरंच सीसी, ओसी, सभागृहाची मंजुरी