ठाणे

लिफ्टच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून सहा वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू

वेदांत हा एकुलता एक मुलगा असून तो इमारतीतील सर्वांशी हसत खेळत रहायचा.

प्रतिनिधी

येथील सांगर्ली मधील एका अनधिकृत बांधकाम ठिकाणी लिफ्टच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. वेदांत जाधव वय वर्षे ६ डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली मधील विघ्नहर्ता इमारतीच्या तळमजल्यावर आपल्या परिवारासह राहत होता. सोमवारी रात्रीपासून वेदांतचा शोध सुरु होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास परिसरातील काही नागरिकांना जवळ सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीतील बांधकामाच्या लिफ्टमधील खड्ड्यात एक चेंडू तरंगतांना दिसला. याची माहिती वेदांतच्या कुटुंबियांना सांगितल्यावर कुटुंबियांसह नागरिक सदर ठिकाणी धावत गेले असता वेदांत मृत अवस्थेत पडलेल्या अवस्थेत दिसला. खड्ड्यातील पाण्यात बुडून वेदांतचा मृत्यू झाला होता.

वेदांत हा एकुलता एक मुलगा असून तो इमारतीतील सर्वांशी हसत खेळत रहायचा. त्याचे वडील खाजगी ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतात. दरम्यान या घटनेला जबाबदार असलेल्या सदर इमारतीच्या विकासकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. २०१२ पासून या अनधिकृत इमारतीचे काम सुरू असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

मॅनहोलमध्ये पडून मुलाचा मृत्यू; पालकांना दोन आठवड्यांत ६ लाखांची नुकसानभरपाई द्या - उच्च न्यायालयाचे KDMC ला आदेश

ऑरेंज गेट- मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज टीबीएमचे अनावरण

Mumbai : पत्नीला पोटगी देणे टाळण्यासाठी आई, भावाच्या खात्यात वळवले पैसे; ‘कारस्थानी’ पतीला हायकोर्टाचा दणका!

आजारी वडिलांना भेटण्यासाठी पत्नीसह लंडनला जाण्याची परवानगी द्या! व्यावसायिक राज कुंद्राची कोर्टात याचिका