एक्स@mieknathshinde
ठाणे

ठाण्यातील अनधिकृत शाळांना ठोकणार टाळे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नियोजन बैठकीत आदेश

ठाण्यातील बेकायदशीरपणे सुरू असलेल्या ८१ शाळांना वार्षिक परीक्षा झाल्यानंतर टाळे ठोका, तसेच या शाळा चालवणाऱ्या संचालकांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहेत.

Swapnil S

ठाणे: ठाण्यातील बेकायदशीरपणे सुरू असलेल्या ८१ शाळांना वार्षिक परीक्षा झाल्यानंतर टाळे ठोका, तसेच या शाळा चालवणाऱ्या संचालकांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर बेकायदा शाळा चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ठाण्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा शाळा असून यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त बेकायदा शाळा या ठाणे महापालिका हद्दीत असल्याचे समोर आले आहे. या बेकायदा शाळांचा मुद्दा बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर आला. यावर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी सांगितले की, ठाणे महापालिका हद्दीत अशा प्रकारे ७५ बेकायदा शाळा आहेत. यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच त्यांना नोटीस ही बजावण्यात आली असल्याचे राव यांनी सांगितले. बेकायदा शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांवर जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहणार असल्याचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला.

यातील काही शाळांना परवानगी देण्यास शासनाकडूनच टाळाटाळ होत असून शिक्षण विभागाने नियमात असलेल्या शाळांना तत्काळ परवानगी देण्याची मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली.

संचालकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

वार्षिक परीक्षा झाल्यानंतर या सर्व बेकायदा शाळांना टाळे ठोकण्याचे आदेश यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना दिले. तर पुढील पंधरा दिवसात कारणमिमांसा करून ज्या शाळा बेकायदा पद्धतीने सुरू आहेत, त्या शाळांना कायमचे सिल करण्यात येणार असून शाळा चालवणाऱ्या संचालकांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नियोजन समितीच्या बैठकीत यावेळी दिली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक