Video : धक्कादायक! धावत्या Bulletला आग लागून ब्लास्ट; एक ठार, ९ जखमी; 'ही' चूक अजिबात करू नका

व्होल्टा हॉटेलजवळ धावत्या बुलेट बाईकच्या इंजिनला अचानक आग लागली. आग लागताच चालकाने...
धावत्या Bulletला आग
धावत्या Bulletला आगx

अलीकडेच हैदराबादमध्ये धावत्या रॉयल एनफिल्ड बुलेट बाईकला आग लागली आणि स्फोट झाला. या भीषण अपघातात एकजण मृत्यूमुखी पडला, तर 9 जण गंभीर जखमी झाले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आतापर्यंत कार आणि इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना पहायला मिळत होत्या. पण आता रॉयल एनफिल्ड बुलेटला आग लागल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर धावणाऱ्या बुलेटच्या इंजिनला आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण बाईक आगीच्या भक्षस्थानी पडली. यावेळी घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, या अपघातात एकजण मृत्यूमुखी पडला तर 9 जण गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हैदराबादच्या मोगलपुरा भवानीपुरा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. व्होल्टा हॉटेलजवळ धावत्या बुलेट बाईकच्या इंजिनला अचानक आग लागली. आग लागताच चालकाने दुचाकीवरून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. यावेळी घटनास्थळी उपस्थित सर्व लोकांनी दुचाकीची आग विझवण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रस्त्याच्या मधोमध दुचाकी जळत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले अनेकजण दुचाकीभोवती उभे राहून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान बाईकच्या इंधन टाकीत अचानक स्फोट झाला आणि आगीच्या भीषण ज्वालांनी आजूबाजूला असलेल्या लोक भाजले.

बुलेटला आग का लागली?

आज तकशी बोलताना भवानीपुरा पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर बालस्वामी म्हणाले, "बुलेट बाईकला आग का लागली, याचं कारण शोधलं जात आहे. मात्र प्रथमदर्शनी इंजिन गरम झाल्यामुळे ही घटना घडल्याचं दिसत आहे. बालास्वामी म्हणाले की, बाईक चालक बराच काळ बाईक चालवत होता. व्होल्टा हॉटेलजवळ पोहोचताच अचानक बाईकच्या इंजिनला आग लागली, त्यानंतर बाईक चालकाने जीव वाचवण्यासाठी बाईकवरून उडी मारली.

यावेळी आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक पुढे आले आणि त्यांनी दुचाकीवरून पाणी व वाळू टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाईकच्या इंधन टाकीत मोठा स्फोट झाला आणि शेजारी उभे असलेले लोक चांगलेच भाजले.”

या अपघातात रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून इतर 9 जणांवर उपचार सुरू असल्याचं बालास्वामी यांनी सांगितलं.

या अपघातात चूक कुठे झाली?

उन्हाळा सुरू झाला की वाहनांना आग लागण्याच्या घटना उघडकीस येऊ लागतात. अशा परिस्थितीत दुचाकी चालकांनीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हैदराबादच्या घटनेतील आगीचे कारण तपासले जात आहे. या प्रकरणात स्थानिक लोकांनीही मोठी चूक केली. अशा वेळी काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

  • आग लागलेल्या वाहनाजवळ कधीही जाऊ नका.

  • आग लागल्यानंतर तातडीने स्थानिक अग्निशमन दलाला माहिती द्या.

  • वाहनातील आग कमी होण्याची प्रतीक्षा करा आणि त्यापासून योग्य अंतर ठेवा.

  • आग लागलेल्या वाहनातील इंधन टाकीचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळं अशा परिस्थितीत स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न करू नका.

  • वाहनाभोवती कधीही उभे राहू नका.

logo
marathi.freepressjournal.in