चण्याच्या महागाईने नमकीन महागणार; बेसनाच्या पदार्थांसाठी खिसा खाली होणार? प्रति क्विंटल दर तब्बल...

विविध प्रकारच्या तिखट शेव, गाठ्या, भावनगरी, विविध प्रकारचे फरसाण, कचोरी आदी पदार्थांसाठी बेसन लागतेच.
चण्याच्या महागाईने नमकीन महागणार; बेसनाच्या पदार्थांसाठी खिसा खाली होणार? प्रति क्विंटल दर तब्बल...

नवी दिल्ली : विविध प्रकारच्या तिखट शेव, गाठ्या, भावनगरी, विविध प्रकारचे फरसाण, कचोरी आदी पदार्थांसाठी बेसन लागतेच. बेसन बनवण्यासाठी लागणाऱ्या चण्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. दिल्लीत चण्याचा दर प्रति क्विंटल ७ हजार रुपये झाला आहे. त्यामुळे येत्या काळात बेसनपासून बनणाऱ्या सर्व पदार्थांसाठी खिसा खाली करावा लागण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांनंतर राजधानी दिल्लीत चण्याच्या भावाने सात हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने चणा व चणा डाळीचे दर वाढले आहेत. दिल्लीत मध्य प्रदेशच्या चण्याला प्रति क्विंटल ७०२५ ते ७०५० रुपये दर मिळाला. राजस्थानच्या चण्याला प्रति क्विंटल ७०७५ ते ७१०० रुपये दर मिळाला.

सरकारने ४ मे रोजी चण्यावरील आयात कर शून्य केला आहे. त्यावेळी दिल्लीत राजस्थानी चणा ६३५० रुपये प्रति क्विंटल तर मध्य प्रदेशचा चणा ६३२५ रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात होता. गेल्या २० दिवसांत चण्याच्या दरात दहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

भारत हा जगातील सर्वात मोठा चणा उत्पादक देश आहे. जगातील ७० टक्के चण्याचे उत्पादन भारतात होते. चण्याच्या वाढत्या दरांमुळे ग्राहक व सरकारची चिंता वाढली आहे.

केंद्रीय कृषी खात्याच्या माहितीनुसार, १ ते २२ मे दरम्यान मंडईंमध्ये १,८४,५९४ टन चण्याची आवक झाली. २०२३ च्या तुलनेत हे प्रमाण ४ टक्क्याने कमी आहे. २०२३ मध्ये १ ते २२ मे दरम्यान १,९१,३६६ टन चण्याची आवक झाली होती. केंद्रीय कृषी खात्याच्या अहवालानुसार, २०२२-२३ मध्ये देशात १०४.७१ लाख टन हेक्टरमध्ये चण्याची शेती झाली. २०२३-२४ मध्ये हीच शेती घसरून १०१.९२ लाख टन झाली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात आणि हरयाणात चण्याच्या पिकाचे क्षेत्रफळ घटले.

logo
marathi.freepressjournal.in