महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक गुजरातपेक्षा दुप्पट, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसFPJ
Published on

मुंबई : देशातील परकीय गुंतवणूक ही विकासाला चालना देणारी असून त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होते. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले असून गुजरात पेक्षा ती दुप्पट असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी याबाबत एक्सवर स्पष्ट केले आहे.

राज्यात २०१४ ते १९ या काळात सत्तेत असताना एकूण ३,६२,१६१ कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. आता सव्वा दोन वर्षांत ३,१४,३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखविली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी असल्याने एकूण गुंतवणुकीचा आकडा आणखी वाढणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगस्नेही धोरणामुळे राज्य गेले दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर राहिले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा राज्यात सर्वाधिक गुंतवणूक

आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १,३४,९५९ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ७०,७९५ कोटी अर्थात ५२.४६ टक्के गुंतवणूक राज्यात आली आहे, असे फडणवीस म्हणाले.

गुंतवणूक गुजरातला वळवली - सचिन सावंत

एप्रिल ते मार्च २०२०-२१ या काळात मोदी सरकारने कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामधील त्या वर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या ७८ टक्के गुंतवणूक गुजरातला पाठवली नसती, तर आमच्या काळात आलेल्या गुंतवणुकीत अजून जवळपास १ लाख कोटी वाढले असते. मग मविआच्या जवळपासही महायुतीला यावेळी जाता आले नसते, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in