मुंबई : रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सोशल मीडियावर गव्हर्नरांचे ‘डीपफेक’ व्हिडीओ फिरत असल्याबद्दल जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला. या व्हिडीओंमध्ये रिझर्व्ह बँकेच्या वतीने काही गुंतवणूक योजना सुरू केल्याचा किंवा पाठिंब्याचा दावा केला जात आहे.
एका निवेदनात आरबीआयने सोशल मीडियावर फिरत असलेल्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या डीपफेक व्हिडीओंबाबत इशारा दिला आहे, ज्यामध्ये आर्थिक सल्ला दिला जात आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे की, गव्हर्नरांचे बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत, ज्यामध्ये काही गुंतवणूक योजना सुरू केल्याचा किंवा त्यांना पाठिंबा दर्शविण्याचा दावा केला जातो, असे निवेदनात म्हटले आहे.
या व्हिडीओंद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना अशा योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. आरबीआय स्पष्ट केले की, त्यांचे अधिकारी अशा कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहींमध्ये सहभागी नाहीत किंवा त्यांना पाठिंबा देत नाहीत आणि हे व्हिडीओ बनावट आहेत. आरबीआय कोणत्याही प्रकारचा आर्थिक गुंतवणूक सल्ला देत नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा डीपफेक व्हिडीओंवर विश्वास न ठेवण्याचे आणि त्यामध्ये गुंतवणूक करून फसवणूक होण्यापासून सावध राहण्याचे आवाहन आरबीआयने जनतेला केले आहे.