भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; टाटांकडून पहिल्या सेमीकंडक्टर चिप्सची निर्यात

जगात प्रत्येक वस्तूत सेमीकंडक्टर चिप लागते. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, कार, विविध औद्योगिक आस्थापना आदींमध्ये सेमीकंडक्टर चिप लागते.
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; टाटांकडून पहिल्या सेमीकंडक्टर चिप्सची निर्यात
Published on

बंगळुरू : जगात प्रत्येक वस्तूत सेमीकंडक्टर चिप लागते. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, कार, विविध औद्योगिक आस्थापना आदींमध्ये सेमीकंडक्टर चिप लागते. या क्षेत्रात तैवान जगभरात आघाडीवर आहे. भारत या क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत सरकारनेही या क्षेत्राला गती मिळवण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. आता टाटा इलेक्ट्रॉनिक्सने भारतात आज इतिहास घडवला. कंपनीने भारतात बनवलेल्या पहिल्या सेमीकंडक्टर चिप्सची पहिल्यांदा निर्यात केली.

कोरोना काळात चीनमधील उद्योगांना मोठा फटका बसला. चीन आणि तैवानमधून मोठ्या प्रमाणात जगाला सेमीकंडक्टर, चिपचा पुरवठा करण्यात येतो. कोरोना काळात पुरवठा खंडित झाल्याने अनेक कार आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनावर परिणाम दिसला. त्याचवेळी भारताने सेमीकंडक्टर हब होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यासाठी भारताने विविध कंपन्यांना सेमीकंडक्टर चिप बनवण्यासाठी आमंत्रित केले. तसेच या क्षेत्राला प्रोत्साहन रक्कम देण्याचे घोषित केले.

टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या बंगळुरू येथील संशोधन आणि विकास संस्थेत सेमीकंडक्टर चिप्स तयार झाली. ही चिप सध्या नमूना स्तरावर आहे. टाटाने या सेमीकंडक्टरचे पॅकेज परदेशातील सहयोगी संस्थांना पाठवले. यात जपान, अमेरिका, युरोप आणि अन्य देशांचा समावेश आहे. वाढती मागणी लक्षात घेता कंपनी आता आसाममधील मोरीगाव आणि गुजरातमधील ढोलेरा येथे उत्पादन युनिट सुरू करत आहे. गुजरातमध्ये तर १० लाख चिप निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन आपल्या समोर लक्ष्य तयार केले आहे. कंपनी २८ ते ६५ नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिप्सची निर्मिती करणार आहे. त्यापेक्षा अधिक उच्च दर्जाच्या चिप्स निर्मितीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

टेस्लासोबत करार

सेमीकंडक्टर उत्पादनात आघाडी घ्यायला टाटा समूहाने टेस्ला या जगविख्यात कंपनीसोबत करार केला. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत टाटा कंपनीला प्रवेशाचा मोठा मार्ग मोकळा होणार आहे. सेमीकंडक्टरच्या साखळी उत्पादन क्षेत्रात भारताने मुसंडी मारल्यास चीनला धक्का बसू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in