नेहा पेंडसेच्या घरातून ६ लाखांचे दागिने चोरी, नोकरावर संशय; पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी नोकराला अटक केली असली तरी अद्याप चोरीला गेलेले दागिने सापडलेले नाहीत. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
नेहा पेंडसेच्या घरातून ६ लाखांचे दागिने चोरी, नोकरावर संशय; पोलिसांनी केली अटक

टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या घरातून 6 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या पतीच्या ड्रायव्हरने एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या एका नोकराला अटक केली आहे. वांद्रे पश्चिम येथील अरेटो बिल्डींगमधील 23 व्या मजल्यावर नेहा पती शार्दुल सिंहसोबत राहते. याच घरात ही चोरी झाली.

माहितीनुसार, सोन्याचे ब्रेसलेट आणि हिरेजडीत अंगठी असा सहा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. शार्दुल सिंग बायस यांचा चालक रत्नेश झा याने पोलिसांना सांगितल्यानुसार, २८ डिसेंबर रोजी बायस यांनी दागिने चोरीला गेल्याचे त्याला सांगितले. चोरीला गेलेला ऐवज बायस यांना चार वर्षांपूर्वी लग्नात गिफ्ट म्हणून मिळाला होता. ते सहसा हे दागिने घराबाहेर जातानाच घालायचे. परतल्यावर नोकर सुमीत कुमार सोलंकी याच्याकडे त्यांनी दागिने दिले होते, ज्याने ते कपाटात ठेवले.

घरकामाची जबाबदारी असलेला सोलंकी त्याच परिसरात अन्य नोकरांसोबत राहतो. बायस बाहेर जाण्याच्या तयारीत असताना ते दागिने आणायला गेले, मात्र कपाटातून दागिने गायब होते. सर्व नोकरांकडे चौकशी केल्यावरही दागिन्यांबाबत काहीच समजू शकले नाही. त्यावेळी सोलंकी घरी नव्हता, नंतर त्याच्याशी संपर्क साधला असता कुलाबा येथे नातलगाच्या घरी असल्याचे त्याने सांगितले.

त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने दागिने कपाटातच ठेवल्याचे सांगितले. बायस यांनी सोलंकीला तातडीने घरी परतण्यास सांगितले, मात्र त्याला येण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे सोलंकीवरील संशय बळावला. दरम्यान, रत्नेश झा याने सोलंकीवर संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी सोलंकीला अटक केली असली तरी अद्याप चोरीला गेलेले दागिने सापडलेले नाहीत. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in