आज दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना लता मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या ३३ वर्षांपासून मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.
बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन, मराठीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक, अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह इतर मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. तसेच, प्रसिद्ध गायक पंकज उदास यांनादेखील सन्मानित करण्यात येणार आहे. यासह इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा हा २४ एप्रिलला मुंबईतील सायनमधील श्री षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याची सुरुवात सांस्कृतीक कार्यक्रमांनी होणार असून कथक नृत्य, राहुल देशपांडे यांची गाण्यांची मैफील, तसेच कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ गायक हरिहरन यांच्या गायनाने होणार आहे.
दरम्यान, अभिनेता प्रसाद ओकने यावरून आपल्या भावना ट्विटवरून व्यक्त केल्या. तो म्हणाला, "ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या वर्षीचा दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार मला जाहीर झाला. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे. चंद्रमुखी आणि धर्मवीर टीम तसेच मायबल प्रेक्षकांचे आभार. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो." आशा भावना त्याने व्यक्त केल्या.