सातासमुद्रापार दिमाखात साकारणार मराठी चित्रपट महोत्सव, कॅलिफोर्निया होणार सिनेमांचे प्रीमिअर

North American Film Association: नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने कॅलिफोर्निया येथे चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सातासमुद्रापार दिमाखात साकारणार मराठी चित्रपट महोत्सव, कॅलिफोर्निया होणार सिनेमांचे प्रीमिअर
Published on

परदेशातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट पोहोचणं ही गोष्ट दिग्दर्शकासाठी अत्यंत महत्त्वाची असते, पण आता आणखी एक मोठा अभिमानास्पद क्षण आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार हे तो म्हणजे, थेट मराठी चित्रपट महोत्सवच अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने कॅलिफोर्निया येथे चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ मराठी चित्रपटच नाही तर मराठी चित्रपट महोत्सवही साता समुद्रापार पोहोचला आहे. नॉर्थ अमेरिकेतील मराठी निर्माते अभिजीत घोलप यांनी सुरू केलेल्या NAFA (North American Film Association) या असोसिएशन मार्फत पहिल्यांदाच या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या चित्रपट महोत्सवाला अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार असून, त्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे कार्यक्रमात आयोजित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगांवकर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, अभिनेत्री अश्विनी भावे अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेता सुबोध भावे, अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक, संगीतकार-दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदी कलाकार मंडळी या चित्रपट महोत्सवास भेट देतील आणि आपले अमूलाग्र मार्गदर्शन करतील. या महोत्सवात NAFA निर्मित “निर्माल्य’’, ‘’अथांग’’ आणि ‘’पायरव’’ या शॉर्टफिल्म्स दाखवल्या जातील. या शॉर्टफिल्म अमेरिकेतच चित्रीत करण्यात आल्या असून तेथील कलाकारांनीच साकारलेल्या आहेत.

NAFA चे संस्थापक अभिजीत घोलप यांनी लोकप्रिय चित्रपट 'देऊळ'ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले होते, तर अभिनेते गिरीश कुलकर्णी यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी अमेरिकेत उभारण्याचा त्यांचा मानस लवकरच पूर्ण होईल अशी आशा. त्याचबरोबर घोलप हे अमेरिकेतील उद्योजकही आहेत.

नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या चित्रपट महोत्सवात ५ फिचर फिल्म्सचे प्रिमिअर, दिग्गजांकडून ६ मास्टरक्लास, ३ पॅनल डिस्कशन, ९ शॉर्ट फिल्म्सचे शो असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. २७ आणि २८ जुलैला कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे हे चित्रपट महोत्सव संपन्न होईल. मराठी सिनेसृष्टी परदेशात प्रगतीपथावर नेण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असेल.

logo
marathi.freepressjournal.in