Marathi Tv Serial Update: आध्यात्मिक-धार्मिक मालिकांची मोठी परंपरा मराठी टेलिव्हिजन विश्वाला आहे. त्यात आघाडीवर आहे ती 'कलर्स मराठी' वाहिनी. गेली अनेक वर्ष अत्यंत लोकप्रिय यशस्वी धार्मिक-आध्यात्मिक मालिका सातत्याने देणाऱ्या कलर्स वाहिनीने आता एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'ची गाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे. 'आई तुळजाभवानी'च्या रुपात प्रसन्न देखणेरूप लाभलेली अभिनेत्री पूजा काळे दिसणार आहे. पूजा भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने विशारद पूर्ण केले आहे. तसेच कथ्थकचंही शिक्षण तिने घेतलं आहे.
'आई तुळजाभवानी' मालिकेचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाल्यापासून ही मालिका विशेष चर्चेत आहे. त्याचा पुढचा टप्पा असलेला भव्यदिव्य प्रोमो प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असून लेकरांच्या हाकेला त्वरित धावून भूतलावर अवतरणाऱ्या 'आई तुळजाभवानी'चं अद्भुत,अलौकिक रूप त्यात पाहायला मिळत आहे. दुर्जनांचा कळीकाळ ठरलेल्या मातेच्या रौद्ररुपाचे, एका हाकेवर उभ्या ठाकणाऱ्या आदिमायेच्या अष्टभुज रुपाचे भव्य दर्शन या मालिकेच्या भव्यतेची साक्ष आहे.
'आई तुळजाभवानी' मालिकेतल्या मुख्य भूमिकेबद्दल पूजा काळे म्हणाली,"आई तुळजाभवानी'ची भूमिका साकारताना आसपास खूप सकारात्मक ऊर्जा जाणवतेय. पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे. मालिकेची संपूर्ण अनुभवी टीम आणि तिचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या मार्गदर्शनाने 'आई तुळजाभवानी' ही भूमिका मनापासून साकारुन प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ उतरेन असा दृढ विश्वास मी व्यक्त करते".
अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' झाली 'आई तुळजाभवानी' लवकरच आपल्या 'कलर्स मराठी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.