
अभिनेता अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिषेकने २००० साली अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवलं. 'रिफ्यूज' हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपट तसंच वेब सीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकली. अभिषेकने 'बोल बच्चन', 'हॉउसफ़ुल्ल ३', 'लुडो' अश्या अप्रतिम चित्रपटांमध्ये काम केलंय.
अभिषेक हा नेहमी प्रत्येक मुद्द्यांवर आपली मत बिनधास्त मांडतो. त्यामुळे कधी कधी त्याला ट्रोलर्सचा देखील सामना करावा लागतो. पण त्या ट्रोलर्सला सुद्धा तो सडेतोड उत्तर देतो. नुकतंच अभिषेक बच्चनने 'दैनिक भास्कर'शी संवाद साधला. यावेळी अभिषेकनं त्याला विचारला गेलेल्या एका प्रश्नाला चांगलंच उत्तर दिलं, जे सध्या खूपच चर्चेत आहे. तसंच अभिषेकने नवीन अभिनेत्यांना एक सल्लाही दिला आहे.
'दैनिक भास्कर'शी संवाद साधताना अभिषेकला एक प्रश्न विचारला गेला की, "तू चित्रपटासाठी सिक्स पॅक अॅब्स बनवशील का?" या प्रश्नावर अभिषेक बच्चन म्हणाला की, "जय दीक्षित हा एक पोलीस होता, जो फिट होता. पण तो असा नव्हता की, तो प्रेक्षकांना शर्ट काढून कधीही सिक्स पॅक अॅब्स दाखवू शकेल. जेव्हा मी लोकांमध्ये सिक्स पॅक अॅब्सबद्दलची क्रेझ पाहतो, तेव्हा मला अतिशय वाईट वाटतं. आता तुम्ही आमिरला पाहा, त्याचे 'धूम ३' मध्ये किती फिट सिक्स पॅक अॅब्स होते आणि 'दंगल' मध्ये तो किती लठ्ठ होता."
यावेळी अभिषेक म्हणाला की, "आजकालच्या तरुण कलाकारांना सिक्स पॅक अॅब्स बनवून मगच अभिनेता होण्याची इच्छा आहे. पण माझ्या भावांनो, तुम्ही भाषेवर अधिक लक्ष द्या आणि अभिनय कौशल्यावरती काम करा. कोणीही बॉडीमुळे नाही तर या गोष्टींमुळे अभिनेता होतो", या विषयामुळेअभिषेक सध्या जोरदार चर्चेत आहे.