दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्येचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गार्गी यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्येचा राष्ट्रवादीत प्रवेश

अभिनेते निळू फुले यांना जाऊन 14 वर्षांचा काळ लोटला असला तरी आजही त्यांच्या आठवणी ताज्या आहेत. आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांच्या प्रमाणे त्यांच्या कन्या गार्गी फुले या देखील कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेत त्यांनी अभिनेत्री गायत्री दातारच्या आईची भूमिका साकारली आहे. आता गार्गी यांनी अभिनयासोबतच राजकारणात यायचं ठरवलं आहे. गार्गी यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गार्गी यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.

गार्गी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांना बऱ्याच दिवसापासून अजित पवार यांच्यासोबत काम करायची इच्छा होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि माझ्या बाबांचे विचार मिळते जुळते असून राष्ट्रवादी काँग्रेसच माझ्या बाबांच्या विचारांना न्याय देईल, असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच त्यांना मुख्य प्रवाहात येऊन काम करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

गार्गी यांना लहानपणापासून अभिनायाचे धडे त्यांना बाबांकडून मिळाले आहेत. त्यांनी 'स्त्रीमुक्ती' या विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यांनी मराठी नाटकं, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in