बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. 56 वर्षीय शाहनवाज यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मिर्झापूर वेब सीरिजमध्ये त्याने अभिनेता अली फजलच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. वृत्तानुसार, एका कार्यक्रमादरम्यान शाहनवाज प्रधान यांना छातीत दुखू लागले आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अभिनेते राजेश तैलंग यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले की, तुम्ही एक महान व्यक्ती आणि उत्तम अभिनेते होता. मिर्झापूरच्या शूटिंगदरम्यान खूप छान वेळ घालवला. आज तुम्ही नाही यावर विश्वास बसत नाही.” अशा शब्दांत राजेश तैलंग यांनी शाहनवाज प्रधान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शाहनवाज प्रधान यांच्या पार्थिवावर उद्या 18 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, 1991 मध्ये शाहनवाज अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. 'जन से जनमंत्र तक' या टीव्ही मालिकेतून त्यांनी पदार्पण केले. 'श्री कृष्ण' या मालिकेत त्यांनी नंद बाबाची भूमिका साकारली होती. 'अलिफ लैला' या मालिकेत सिंदबाद द सेलरची भूमिका साकारली होती. याशिवाय ते 'ब्योमकेश बक्षी', 'तोटा वेड्स मैना', 'बंधन सात जन्म का' आणि 'सूट लाइफ ऑफ करण अँड कबीर' या मालिकांमध्येही दिसले होते. शाहनवाज यांनी 'बंगिस्तान', शाहरुख खानचा 'रईस', एमएस धोनीचा बायोपिक आणि 'मिर्झापूर' या लोकप्रिय वेब सीरिजमध्येही काम केले आहे.