मुंबई : ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावरून सुरू झालेल्या वादावर अखेर गुरुवारी मुंबई हायकोर्टाने पडदा पडला. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी ट्रेडमार्क आणि कॉपीराईट उल्लंघनाच्या मुद्द्यावर अभिनेते शरद पोंक्षे यांना न्यायालयात खेचल्याने गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी पोंक्षे यांनी माघार घेत नव्या नाटकाच्या नावात ‘नथुराम गोडसे बोलतोय’ ऐवजी ‘नथुराम गोडसे’ असा बदल करणार असल्याचे न्यायालयात सांगितले. याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी २७ ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवली.
माऊली भगवती प्रॉडक्शन्सच्या ‘नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकावरून निर्माण झालेला वाद मुंबई हायकोर्टात पोहोचला. या नव्या नाटकातील संहिता, सादरीकरण तसेच ट्रेडमार्कचे आमच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकाशी साधर्म्य आहे. त्यामुळे आमच्या व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करत माऊली प्रॉडक्शन्सचे मालक व निर्माते उदय धुरत यांनी प्रमोद धुरत व अभिनेते शरद पोंक्षे यांच्याविरोधात दावा दाखल केला.
या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्यासमोर सुनावणीवेळी उदय धुरत यांच्यातर्फे ॲॅड. हिरेन कमोद व ॲॅड. महेश म्हाडगुत यांनी तर प्रतिवादींतर्फे ॲॅड. रशमीन खांडेकर यांनी बाजू मांडली. माऊली भगवती प्रॉडक्शनने ट्रेडमार्क आणि कॉपीराईट कायद्याचे सरळसरळ उल्लंघन करून नवे ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगभूमीवर आणल्याचा जोरदार युक्तिवाद ॲॅड. कमोद यांनी केला. त्यावर हा दावा पूर्णत: खोटा असल्याचा दावा प्रतिवादी माऊली भगवती प्रॉडक्शन आणि शरद पोंक्षे यांच्या वतीने ॲॅड. खांडेकर यांनी केला.
याचवेळी पोंक्षे यांनी नवीन नाटकाच्या नावात 'नथुराम गोडसे बोलतोय' ऐवजी ‘नथुराम गोडसे’ असा बदल करणार असल्याची तयारी दर्शवली. त्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडे अर्ज करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला. न्यायालयाने त्यांना वेळ देतानाच त्यांच्या अर्जावर विचार करण्याबाबत सेन्सॉर बोर्डाला निर्देश दिले. याप्रकरणी २७ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी न्यायालय कॉपीराईट उल्लंघनाच्या मुद्द्यावर युक्तिवाद ऐकून घेणार आहे. त्यावर पोंक्षेंच्या नाटकाचे भवितव्य ठरणार असल्यामुळे सुनावणीकडे संपूर्ण रंगभूमीचे लक्ष लागले आहे.
मूळ नाटकाशी साधर्म्य; रेकॉर्डिंगच्या आधारे दावा
शरद पोंक्षेंनी मूळ ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पूर्णपणे हायजॅक केले आहे, असा दावा याचिकाकर्त्या उदय धुरत यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने मागील सुनावणीवेळी दिलेल्या परवानगीनुसार, नाटकाच्या शोचे रेकॉर्डिंग केले. त्यात नव्या नाटकाची संहिता आणि सादरीकरणाचे मूळ नाटकाशी साधर्म्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
नाटकाच्या वादात नातवाची उडी
सुनावणीवेळी नथुराम गोडसे यांचे नातू गोपाळ गोडसे यांनी ॲॅड. उदय वारुंजीकर आणि ॲॅड. सिद्धेश पिळणकर यांच्यामार्फत हस्तक्षेप याचिका दाखल केली. त्यावर कॉपीराईटच्या वादात आपला संबंध काय, अशी विचारणा न्यायमूर्ती छागला यांनी केली. तसेच गोडसे कुटुंबियांचे म्हणणे पुढील सुनावणीवेळी ऐकून घेतले जाईल, असे न्यायालयाने नमूद केले.