अभिनेत्री दीपा परब हिचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

कलाकारांनी साकारलेले पात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहते.
अभिनेत्री दीपा परब हिचं छोट्या पडद्यावर पुनरागमन
Published on

झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका ही नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. मालिकेची कथा त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत असतात. मालिकेतील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटत असतात. कलाकारांनी साकारलेले पात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहते. अशाच एका अभिनेत्रीचे झी मराठी वाहिनीवर पुनरागमन होणार आहे.

या आधी अभिनेत्री दीपा परब हिने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. दामिनी या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यावतरी भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं पण बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील आगामी मालिका तू चाल पुढं मध्ये दीपा हि प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला त्यात एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची गोष्ट आहे. एकत्र कुटुंब असलेल्या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी खारीचा वाटा देण्याची इच्छा या प्रोमो मधून झळकताना दिसते. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब सोबतच तुझ्यात जीव रंगला मधील वाहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर देखील महत्वाची भूमिका साकारताली आहे. झी मराठीवरील ही मालिका १५ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना दीपा परब म्हणाली, "बऱ्याच काळानंतर मराठी दैनंदिन मालिका करताना स्वतःच्या घरी परातल्याची भावना आहे. तू चाल पुढं या मालिकेचं कथानक अतिशय सुंदर असून हि कथा गृहिणी असलेल्या अश्विनी भोवती फिरते आणि आपल्या कुटुंबासाठी ती काय करते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. बऱ्याच कालावधी नंतर मराठी मालिका करतेय त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा भरभरून मिळेल अशी मी आशा करते. या मालिकेतील अश्विनी हि प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल आणि आपल्यातलीच एक कोणीतरी छोट्या पडद्यावर आपलं नेतृत्व करतेय आणि त्याचसोबत आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतेय हे त्यांना नक्कीच जाणवेल अशी मला खात्री आहे."

logo
marathi.freepressjournal.in