'सरी' प्रेमाच्या त्रिकुटाची उत्कट कहाणी ; रितिका, अजिंक्य आणि पृथ्वी अंबर मुख्य भूमिकेत

या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण
'सरी' प्रेमाच्या त्रिकुटाची उत्कट कहाणी ; रितिका, अजिंक्य आणि पृथ्वी अंबर मुख्य भूमिकेत
VGP

त्याच्या, तिच्या आणि त्याच्या प्रेमाची अकल्पित कहाणी असलेला 'सरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाचा त्रिकोण असणाऱ्या या चित्रपटात पृथ्वी अंबर मुख्य भूमिकेत असून, त्याच्यासोबत अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि मृणाल कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री रितिका श्रोत्री, अभिनेता अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांनी दै. 'नवशक्ति'च्या कार्यालयाला भेट देत खास बातचीत केली.

अनेक सिनेमांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रितिका श्रोत्री. आजतागायत साकारलेल्या बिनधास्त आणि बेधडक भूमिकांमुळे तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे; मात्र 'सरी' चित्रपटात रितिका एका वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार असून, आतापर्यंतच्या तिच्या भूमिकेपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे. सोज्वळ आणि रोमँटिक 'दिया'चा हा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच पसंतीस पडेल!

VGP

आपल्या भूमिकेबद्दल रितिका श्रोत्री म्हणते, ''सरीमधील दियाची भूमिका साकारणं, माझ्यासाठी आनंद देणारा अनुभव होता. कारण, याआधीच्या माझ्या सर्व सिनेमांमध्ये मी बेधडक भूमिका साकारल्या आहेत. ज्यात मी खूपच बिनधास्त दिसली आहे. त्या मुलींना जे वाटते, ते त्या ठामपणे व्यक्त करत असतात; मात्र या चित्रपटांमध्ये 'दिया' चा असा स्वभाव आहे, जिला खूप काही वाटते, खूप काही बोलायचं असतं, परंतु ती अंतर्मुख असल्यामुळे ती आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे ही भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप वेगळा आणि सुंदर अनुभव आहे.''

'मन उडू उडू झालं' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अजिंक्य राऊत या चित्रपटाबद्दल म्हणतो की, नव्या चित्रपटाबाबत खुप उत्सुक आहे. मी आधी मालिकांमध्ये काम करत होतो. आता मोठ्या स्क्रीनवर काम केलं, अर्थात माध्यम वेगळं आहे, त्यामुळे खुप गोष्टी शिकायला मिळाल्या. तसंच हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे. कारण याच सिनेमाच्या चित्रीकरणावेळी मी दिवसा 'मन उडू उडु झालं' च शूटिंग करत होतो आणि रात्री विमान पकडून मी बँगलोरला या सिनेमाच्या शूटिंगसाठी जात होतो. त्यामुळे हा खुप वेगळा अनुभव माझ्यासाठी होता. एका कलाकारासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, जेव्हा त्याला एकाच वेळी दोन वेगळ्या माध्यमामध्ये काम करायला मिळतं."

अशोका के. एस. दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या नावामागचं रहस्य काय ?

'सरी' हे नाव मी सिनेमाला दिल. दिग्दर्शकांना ते खुप आवडलं. सुरुवातीला खुप नाव काढली होती. प्रेमासंबंधात अनेक नाव चर्चिली गेली. या रोमॅण्टिक चित्रपटाला काय नाव द्यावं? असा प्रश्न होता. तेव्हा पहिलं नाव माझ्या डोक्यात आलं 'सरी'... कारण जेव्हा खूप उन्हाळा असतो आणि अचानक पावसाची सर येते आणि ती खुप ओलावा देऊन जाते. ही पावसाची सर खुप हवीहवीशी वाटते. ती खुप दुष्काळात येऊन गेलेली असते, म्हणून तिचं एक वेगळं महत्त्व असतं. तसंच आपल्या आयुष्यातही माणसं सतत येत असतात आणि निघूनही जातात, पण काहीजण आपल्या आयुष्यात ओलावा देऊन जातात. मग ते हवेहवेसे देखील वाटतात. म्हणून सिनेमाचं नाव 'सरी' आहे.

पृथ्वी अंबरचे मराठीत पदार्पण

पृथ्वी अंबर अमराठी असला, तरी त्याचा मराठीशी खूप जवळचं नातं आहे. याचा खुलासा पृथ्वीने स्वतःच केला आहे. आपल्या मराठीतील पहिल्या भूमिकेबद्दल पृथ्वी अंबर म्हणतो, ''माझा जन्म कर्नाटकातील उडुपी येथे झाला असला तरी प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला भेट देणे ही माझ्यासाठी एक परंपराच होती आणि त्यामुळेच मला मराठी भाषेची आणि संस्कृतीची ओळख झाली. माझे खूप जवळचे नातेवाईक आणि मित्र हे मराठी बोलणारे आहेत. नटरंग, नटसम्राट आणि सैराट सारख्या मराठी चित्रपट मला आवडतात. दर्जेदार अभिनय, कलाकार आणि संगीत यासाठी हे चित्रपट मी पुन्हा-पुन्हा पाहतो. मी कधी कल्पनादेखील केली नव्हती की, मी मराठी चित्रपटात काम करेन. अजिंक्य, रितिका श्रोत्री त्यासोबतच मला कायमच आवडणाऱ्या मृणाल कुलकर्णी यांच्यासारख्या कलाकारांसोबत मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. माझे दिग्दर्शक अशोका के. एस. यांचे मी आभार मानतो, ज्यांनी मला बळ दिले आणि मला ही संधी दिली.''

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in