
बॉलीवूडचा किंग शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठाण' ला मिळालेल्या यशानंतर आता त्याचे चाहते त्याच्या 'जवान' चित्रपटाची वाट पाहत आहेत . काही दिवसांआधी 'जवान' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना यातील शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स पसंत पडले आहेत. या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग देखील सुरू झालं असून प्रदर्शना आधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.
संपूर्ण चित्रपटसृष्टीतसुद्धा 'जवान' चित्रपटाची चर्चा चालू आहे. सिनेमातील कलाकारदेखील या चित्रपटाबद्दल भरभरून बोलत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्या आधी चेन्नईमध्ये एक प्री-रिलीज इवेंट आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने त्या इवेंटला हजेरी लावली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीलही बरेच कलाकार मंडळी तिथे हजर होते. त्यावेळचा शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या इवेंटदरम्यान 'जवान' चा दिग्दर्शक अॅटली हा त्याच्या संपूर्ण कुटुंबासह तिथं आला होता. जेव्हा अॅटली त्याच्या आईला घेऊन मंचावर आला तेव्हा त्यांना पाहून शाहरुख खान त्याच्या आईसमोर नतमस्तक झाला आणि वाकून त्याच्या आईला नमस्कार केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शाहरुख खान हा खूप साधा आणि आपल्या संस्कारांशी जोडलेला स्टार आहे असं त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे. 'जवान' या चित्रपटाची सध्या जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाची तब्बल ५ लाख तिकीटे विकली गेली असून हा चित्रपट सगळेच रेकॉर्ड मोडीत काढणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या चित्रपटात शाहरुखसह विजय सेतुपती, नयनतारा, सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा आणि मराठमोळी गिरिजा ओक हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.