

मुंबई : पैशांसाठी माणूस काय काय करू शकतो, याची गंमतीदार झलक दाखवणारा ‘अफरातफरी’चा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून या टिझरने प्रेक्षकांची चित्रपटाबद्दची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओमकार भोजने हे तीन भाऊ, त्यांच्या वडिलांनी काढलेली खास पॉलिसी आणि त्या पॉलिसीमधून मिळणाऱ्या तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम… या सगळ्याभोवती फिरणाऱ्या गोंधळाची झलक टिझरमध्ये पाहायला मिळते. मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित, अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा धमाल चित्रपट ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘अफरातफरी’च्या टिझरमध्ये शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओमकार भोजने हे तीन भाऊ दिसत असून त्यांच्या वडिलांनी अशी पॉलिसी काढलेली असते, ज्यानुसार त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास तिन्ही मुलांना एक कोटी रुपये मिळणार असतात. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या या मोठ्या रकमेभोवती तिन्ही भावांची विचारांची चक्रे फिरताना दिसतात. एक कोटींची ही रक्कम मिळवण्यासाठी आता या तिघांच्या मनात नेमके काय सुरू आहे, याची उत्सुकता टिझर निर्माण करतो. विशेष म्हणजे टिझरमध्ये तात्यांचा अपघात होताना दिसतो, तर पुढच्याच दृश्यात त्यांच्या फोटोला हार घातलेला पाहायला मिळतो. त्यामुळे तात्यांचा खरंच अपघाती मृत्यू झाला आहे का? त्यांच्या मृत्यूनंतर तीन भावांना एक कोटी रुपये मिळणार का? आणि या पैशांसाठी या तिघांकडून नेमकी कोणती ‘अफरातफरी’ घडणार आहे? असे अनेक प्रश्न टिझर पाहिल्यानंतर निर्माण होतात. पैशांचे आमिष, तीन भावांची धावपळ आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यामुळे ‘अफरातफरी’ची कथा भन्नाट मनोरंजनाची मेजवानी देणार असल्याचे दिसते.
पाहा टिझर
‘अफरातफरी’मध्ये मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओमकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फौज व पैशांभोवती फिरणारी गंमतीदार कथेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणाले, ‘अफरातफरी’ची कथा ही पैशांच्या हव्यासातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार परिस्थितीभोवती फिरणारी आहे. एका पॉलिसीमुळे तिघांच्या आयुष्यात कोणता गोंधळ निर्माण होतो, याची झलक टिझरमधून दाखवली आहे. शशांक शेंडे, संजय नार्वेकर व ओमकार भोजने यांची केमिस्ट्री व त्याच्यातून निर्माण होणारे मजेशीर प्रसंग हे या चित्रपटाचे खास आकर्षण आहे.’