मुंबई/रायपूर : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यापाठोपाठ आता अभिनेता शाहरूख खान यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्याच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे, असे गुरुवारी मुंबई पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, या धमकीनंतर शाहरूख खानचे घर ‘मन्नत’बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अभिनेता शाहरूख खान याला देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी मुंबई पोलिसांनी रायपूर येथील एका व्यक्तीला पाचारण केले आहे, असे रायपूरमधील एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या देण्यात आल्या, त्यानंतर आता शाहरूख खान याला धमकी देण्यात आली आहे.
शाहरूख खान याला जीवे मारण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची मागणी करणारा दूरध्वनी वांद्रे पोलीस ठाण्यात आला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. धमकीचा दूरध्वनी छत्तीसगडमधून करण्यात आला होता, याला मुंबई पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही, असे रायपूर पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र मुंबई पोलिसांनी याप्रकरणी रायपूरमधील एका व्यक्तीला नोटीस बजावली आहे.
शाहरूख खान याला धमकी देण्यात आल्यानंतर मुंबई पोलीस रायपूर येथे आले आणि त्यांनी फैयाज नावाच्या व्यक्तीवर नोटीस बजावली आहे. फैयाज याच्या नावावर नोंदणी असलेल्या दूरध्वनीवरून धमकीचा दूरध्वनी आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. फैयाज याला वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
यापूर्वीही आल्या होत्या धमक्या
शाहरूख खानला २०२३ मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांच्या यशानंतर सतत धमक्या येत होत्या. तक्रार नोंदवल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली होती. तेव्हापासून शाहरूख खान सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत फिरतो.