प्रशांत दामले रंगकर्मी पॅनेलचा दणदणीत विजय; नाट्य परिषद पंचवार्षिक निवडणूक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलने घवघवीत यश संपादन केले
प्रशांत दामले रंगकर्मी पॅनेलचा दणदणीत विजय; नाट्य परिषद पंचवार्षिक निवडणूक

(संजय कुळकर्णी)

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलने घवघवीत यश संपादन केले असून, प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलला मात्र दारुण पराभवास तोंड द्यावं लागलं आहे. रंगकर्मी पॅनलला ८, तर आपलं पॅनलला अवघ्या २ जागा मिळाल्या.

होणार होणार म्हणून लक्ष लागलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक रविवार, १६ एप्रिल रोजी महाराष्ट्रात पार पडली. मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, सांगली, धुळे, सोलापूर, नगर, बीड, वाशीम आणि नागपूर या महाराष्ट्रातील नाट्य परिषद शाखांच्या विभागात मतदान झाले. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, अमरावती आणि बेळगाव या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध झाली. प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनल आणि आमलं पॅनल यात निवडणुकीत अटीतटीची चुरस होईल असा जाणकारांचा व्होरा होता, पण निवडणुकीचे निकाल पाहता यंदाची निवडणूक ही एकतर्फी झाली असंच म्हणावं लागेल.

मुंबईत रंगकर्मी नाटक समूह पॅनेलचे ८ उमेदवार विजयी झाले, तर आपलं पॅनेलच्या फक्त २ उमेदवारांना निवडणूक जिंकता आली. प्रसाद कांबळी यांनी मतांची फेरतपासणी केल्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप जाधव यांना पराभवाचा चटका बसला. त्यांनीही पुनः फेरतपासणीसाठी निवडणूक प्रमुखांकडे अर्ज दाखल केला आहे. नियामक मंडळ सदस्यांच्या एकूण ६० जागा असून, रंगकर्मी नाटक समूह पॅनलला एकूण ५२ जागांवर विजय मिळालेला आहे. आता स्पष्ट बहुमतांवरून प्रशांत दामले हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडले जातील. खरी चुरस प्रमुख कार्यवाह आणि खजिनदार या पदासाठी असेल. प्रमुख कार्यवाह हा महाराष्ट्रातील असेल का मुंबईचा असेल, हे लवकरच समजेल.

अजित भुरे आणि संजय देसाई या दोघांपैकी एकाची त्या पदासाठी निवड होऊ शकते. खजिनदार पदासाठी कोल्हापूरमधून निवडून आलेले गिरीश महाजन किंवा बेळगावमधून निवडून आलेल्या वीणा लोकूर यांच्यात बहुधा चुरस होईल. नाट्य परिषद निवडणुकीचे निवडणूक प्रमुख गुरुनाथ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक घेतली जाईल. लवकरच ते त्यासंबंधात घोषणा करतील.

मुंबईतून विजयी झालेले उमेदवार

प्रशांत दामले [७५९], विजय केंकरे [७०५], विजय गोखले [ ६६४], सयाजी शिंदे [६३४], सुशांत शेलार [६२३], अजित भुरे [६२१], सविता मालपेकर [५९१], वैजयंती आपटे [५९०] हे सर्व रंगकर्मी नाटक समूह पॅनेलचे विजयी उमेदवार असून, आपलं पॅनलच्या सुकन्या कुलकर्णी-मोने [५६७] आणि प्रसाद कांबळी [५६५] हे उमेदवार विजयी झाले. मुंबई उपनगरमधून संजय देसाई, राजेशिर्के, अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे उमेदवार विजयी झाले. मतदारांनी आमच्यावर दाखवलेल्या या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र ठरू आणि आता आमची जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे. सर्व मिळून ती पेलू आणि नाट्य परिषदेला शिखरावर नेऊ, असा विश्वास रंगकर्मी नाटक समूह या पॅनेलच्या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांनी व्यक्त केला.

कोर्टकचेरी, अध्यक्षपदाच्या वादामुळे पराभव

या निवडणुकीत विजयाचे संकेत रंगकर्मी नाटक समूह पॅनेलला रंगकर्मींकडून मिळालेले होते. दोन वर्षांच्या कोर्टकचेऱ्या आणि अध्यक्षपदाच्या वादामुळे तसेच त्यांनी राजीनामा न दिल्यामुळे प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलच्या उमेदवारांना पराभव पत्करायला लागला, अशी चर्चा व्यावसायिक आणि हौशी रंगकर्मीयांत रंगताना दिसत आहे. निवडून आलेल्या उमेदवारांची मतदान मिळालेल्या आकडेवारी पाहता यंदाची निवडणूक थोड्याफार प्रमाणात एकतर्फी झाल्याचे चित्र आहे. या घवघवीत यशामुळे रंगकर्मींत उत्साहाचे वातावरण असून, नवी कार्यकारिणी स्वछ कारभार करेल आणि लवकरच १०० व्या नाट्य संमेलनाची तारीख आणि ठिकाण जाहीर करेल, असा विश्वास रंगकर्मींनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in