

वैविध्यपूर्ण कलाकृती करून प्रेक्षकांना मोहित करणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. आजवर अमृताने सिनेमा, मालिका, ओटीटी या प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण, आता अमृता प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देणार आहे, ते म्हणजे अमृता खानविलकर लवकरच एका नव्या कोऱ्या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करताना दिसणार आहे.
अमृता "लग्न पंचमी" या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करणार असून लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी अमृताने तिच्या वाढदिसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून येणाऱ्या वर्षात काहीतरी मनाच्या अगदी जवळ असलेला प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याची माहिती दिली होती आणि आता ती या नव्या नाटकातून रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे.
नाटकासाठी ‘हो’ म्हटलं, कारण...
नव्या प्रवासाबद्दल बोलताना अमृता सांगते "लग्न पंचमी या नाटकासाठी ‘हो’ म्हणण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मी ज्या टीमसोबत काम करते आहे, ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मधुगंधा सारखी दिग्गज लेखिका आणि निपुणसारखा सतत नवं काहीतरी सिद्ध करणारा दिग्दर्शक अशा दोन प्रखर आणि त्यांच्या कलेशी प्रामाणिक असलेल्या व्यक्तिमत्त्वांसोबत काम करण्याची संधी म्हणजे माझ्यासाठी एखादी अमूल्य भेट आहे. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद, त्यांची प्रत्यक्ष उर्जा, हे मला नृत्य सादरीकरणामधून, सिनेमामधून कायम मिळालंय. पण, कथानक जिवंत ठेवत, दररोज रंगमंचावर जगणं हा एक वेगळाच आनंद असणार आहे. प्रेक्षक मला या नाटकातून कसं स्वीकारतील याची खूप मला उत्सुकता आहे. आता जे काही करतेय ते मला प्रचंड सर्जनशील समाधान देणारं आहे आणि हे सगळं नाटकामुळे शक्य झालंय. एका नव्या वर्षाची सुरुवात इतक्या जबरदस्त प्रोजेक्टने होणं म्हणजे माझ्यासाठी मोठं भाग्यच आहे."
याआधी अमृताने नृत्याच्या माध्यमातून स्टेजचा थरार अनेकदा अनुभवलाय मात्र नाटकातून प्रेक्षकांसोबत होणारा रोजचा संवाद तिच्यासाठी उत्कंठेचा विषय ठरणार आहे. पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत असल्याने अमृता देखील या नाटकासाठी खूप उत्सुक असल्याचं कळतंय. प्रसिद्ध लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि अफलातून दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या नाटकातून अमृता रंगमंचावर नवी छटा सादर करून नव्या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.