अशोक सराफ यांच्यातर्फे बॅकस्टेज कलाकारांचा सन्मान

मुंबईत ‘कृतज्ञ मी...कृतार्थ मी' हा खास सोहळा संपन्न
अशोक सराफ यांच्यातर्फे बॅकस्टेज कलाकारांचा सन्मान

एखादा कलाकार जेव्हा खूप मोठा होतो , अगदी यशाचं शिखरदेखील गाठतो , पण यानंतरही जेव्हा सोबतीच्या बॅकस्टेज कलाकारांना विसरत नाही, त्यांच्या ऋणात राहतो, तेव्हा तो कलाकार एक उत्तम माणूस म्हणून ओळखला जातो. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्यामुळे नुकताच याचा प्रत्यय आला.

सराफ कुटुंबीय आणि ‘ग्रंथाली’ यांच्यातर्फे ‘कृतज्ञ मी...कृतार्थ मी’ या कृतज्ञतासन्मान सोहळ्याचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. या सोहळ्यात रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि बॅकस्टेज कलाकार अशा २० जणांचा सन्मानचिन्ह आणि ७५ हजार रुपये देऊन अशोक सराफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

अशॊक सराफ यांच्या ‘मी बहुरूपी’ या पुस्तकासाठीच्या निधीचा विनियोग या कलावंतांच्या सन्मानासाठी करण्यात आला. ही संकल्पना निवेदिता सराफ यांची होती.

''इतकी वर्षं माझ्यासोबत ज्यांनी काम केलं, त्यांचं कौतुक करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांना मी दिलेली ही मदत नाही, तर ही माझ्याकडून एक आदरपूर्वक, प्रेमपूर्वक दिलेली भेट आहे. आजच्या सोहळ्याबद्दल बोलायचं तर खरोखरच ‘कृतज्ञ मी, धन्य मी’ अशी भावना मनात दाटून आली आहे.'' असं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले.

''रंगभूमीसाठी आयुष्य वेचणाऱ्या वयोवृद्धकलाकार-तंत्रज्ञांच्या कार्याचा आम्ही सन्मान केला आहे. सराफ कुटुंबानेकेलेली  ही मदत नसून एक भेट आहे.''असंही ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले.

यावेळी विजय केंकरे, विनय येडेकर, संजय मोने, मीना नाईक, सुकन्या कुलकर्णी, श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव, मीना कर्णिक ही कलाक्षेत्रातील मान्यवर मंडळीदेखील उपस्थित होती. या सोहळ्यात श्रीरंग भावे, मानसी फडके यांनी नाट्यगीते सादर केली. तर अतुल परचुरे आणि डॉ. मृण्मयी भजक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in