'आयुष्यातलं हॅप्पी डेस्टिनेशन...' पूजा सावंतच्या 'मुसाफिरा'चा ट्रेलर झाला रिलीज

'पंचक', 'ओले आले', 'सत्यशोधक', या तीन शानदार सिनेमांमुळे मराठी चित्रपटसृष्टीची नववर्षाची सुरूवात धमाकेदार झाली आहे.
'आयुष्यातलं हॅप्पी डेस्टिनेशन...' पूजा सावंतच्या 'मुसाफिरा'चा ट्रेलर झाला रिलीज
PM

'पंचक', 'ओले आले', 'सत्यशोधक', या तीन शानदार सिनेमांमुळे मराठी चित्रपटसृष्टीची नववर्षाची सुरूवात धमाकेदार झाली आहे. अशातच आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो म्हणजे 'मुसाफिरा'. पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय.

कसा आहे ट्रेलर, कधी होणार रीलिज?

रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले पाच मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेल्या समस्या, चढ-उतार या सगळ्यांचा सामना करून कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटलं की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करताना दिसत आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी आपल्या सर्वांना २ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मुसाफिर म्हणजे मैत्रीची परिभाषा-

"मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्त्वाची हेही 'मुसाफिरा'च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीवर भाष्य करणारा हा एक कौटुंबिक चित्रपट आहे." असे दिग्दर्शक पुष्कर जोगने सांगितले. 'मुसाफिरा' या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

logo
marathi.freepressjournal.in