
मुंबई : दूरदर्शनचा छोटा पडदा गाजवणाऱ्या 'चिमणराव आणि गुंड्याभाऊ' या मालिकेतील 'गुंड्याभाऊ' ची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कन्या स्वाती कर्वे यांनी दिली. ते ९५ वर्षांचे होते.
बाळ कर्वे यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३० ला झाला होता. त्यांनी 'चिमणराव आणि गुंड्याभाऊ' मालिकेत केलेली गुंड्याभाऊची भूमिका लोकांच्या मनात आजही घर करुन राहिली आहे. या मालिकेतील भूमिकेमुळे बाळ कर्वेना लोक 'गुंड्याभाऊ' या नावानेच हाक मारु लागले होते. बाळ कर्वे यांनी विजया मेहता आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नाट्य प्रवासाची सुरुवात केली. लालन सारंग यांच्याबरोबर 'रथचक्र', 'तांदूळ निवडता निवडता', भक्ती बर्वेबरोबर 'मनोमनी', 'आई रिटायर होते', डॉ. गिरीश ओकांबरोबर 'कुसूम मनोहर लेले' अशी नाटके केली.
भारतीय टीव्ही मालिकांची नांदी देणारी चिं. वि. जोशी यांच्या 'चिमणराव' या मालिकेत त्यांनी गुंड्याभाऊंची भूमिका छोट्या पडद्यावर साकारली होती. हाती विनोदाचा सोटा घेऊन गुंड्याभाऊने रसिकांच्या मनावर कब्जा मिळवला. या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचे नाव विचारात होते, पण काही कारणाने हे घडले नाही आणि ही भूमिका बाळ कर्वे यांना मिळाली. त्यांनी ती भूमिका अजरामर केली.
बाळ कर्वे यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी धक्का बसला असून त्यांनी शोक व्यक्त केला आहे.